भुलेचे तंत्रज्ञान आले आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला

आज 16 ऑक्टोबर.. इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, यातली एक घटना आजच्या दिवशी 1846 साली घडली होती.
भुलेचे तंत्रज्ञान आले आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला


'नायट्रस ऑक्साईड' हा वायू 'लाफिंग गॅस' म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा शोध लागला तेंव्हा तो वायू हुंगण्याच्या पार्ट्या होत असत. मोठेमोठे अमीर-उमराव जेवणानंतर नायट्रस हुंगत आणि मोठ्यामोठ्याने हसत सुटत, एकमेकांच्या माकडचेष्टा करत, याने त्यांची चांगलीच करमणूक होत असे.. हे त्याकाळचे 'नाईट लाईफ'च होते म्हणा ना! असे नायट्रसचे प्रयोग 'फन फेअर्स' मध्ये देखील होत असत.. अशाच एका 'गार्डनर कोल्टन'ने 1844च्या नाताळात आयोजित केलेल्या सायन्स फन फेअर मध्ये नायट्रस हुंगून बावचळलेला एक माणूस स्टेजवरून खाली पडला आणि त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. तरीपण त्याला याची जाणीवच झाली नाही, हे तिथं उपस्थित असलेल्या होरॅस वेल्स या डेंटिस्टनं पाहिलं. दात काढताना त्याचे पेशंट मोठ्यामोठ्याने ओरडल्याने बाहेर बसलेले पेशंट देखील घाबरून पळून जात असत म्हणून तो त्रस्त होता. मग त्याने विचार केला, उद्या आपण याचा प्रयोग करून बघू.. आणि हा प्रयोग त्याने स्वतःवरच लगेच दुसऱ्या दिवशी स्वतःचा दात काढून घेऊन केला. त्याला अजिबात दुखले नाही. तो यशस्वी झाला. नंतर घाईघाईतच त्यानं या शस्त्रक्रियेचं बोस्टन मध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. पण त्यात पेशंटकडून पुरेसा नायट्रस न हुंगला गेल्यामुळे ते डेमोन्स्ट्रेशन यशस्वी झालं नाही..  त्यात होरॅस वेल्सची खूप नाचक्की झाली. पुढे त्याला डिप्रेशन आले आणि त्यातच त्यानं सुसाईड केली..
असो..

त्या डेमोन्स्ट्रेशन मध्ये 'विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन' असं लांबलचक नाव असलेला एक माणूस हजर होता. त्याला कळलं की 'इथं काहीतरी चुकतंय'.. मग त्यानं स्वतःचे प्रयोग सुरू केले. मध्यंतरी काही कारणांनी त्यानं नायट्रस ऐवजी 'इथर' वापरायचं ठरवलं.. तब्बल दोन वर्षे केलेल्या अनेक प्रयोगानंतर या WTG Mortan नं मॅसेच्युसेटच्या जनरल हॉस्पिटल मध्यल्या बुल्फिन्च अँफीथिएटरमध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. (त्याकाळी ऑपरेशन्स हे जाहीररित्या अँफी थिएटरमध्ये होत असत म्हणून त्याला तेंव्हा 'ऑपरेशन थिएटर' असं म्हणलं जात असे. तेंव्हापासून आजतागायत ऑपरेशनच्या खोलीला 'ऑपरेशन थिएटर'च म्हणलं जातं) असो..

त्या दिवशीचा तो भुलेचा जाहीर प्रयोग यशस्वी झाला.. तो दिवस होता 16 ऑक्टोबर 1846..  आणि या दिवसापासून वैद्यकशास्त्रातील या नव्या पर्वाला सुरुवात झाली. We have conquered pain! अशा अर्थाच्या हेडलाईन्सनी दुसऱ्या दिवशीचे सगळे न्यूजपेपर भरून गेले.. नंतर लंडन, पॅरिस, बर्लिन, पीटर्सबर्ग अशा अनेक ठिकाणी 'इथर' वापरून शस्त्रक्रिया झाल्या, आणि अनॅस्थेशियाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले.


...आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला!!


पुढे नायट्रस व इथर नंतर क्लोरोफॉर्म आला. त्याचा शोध आधीच 1831 मध्ये लागला होता, पण त्याच्यातल्या बेशुद्धीच्या गुणाची कल्पना नव्हती. एकदा स्कॉटलंडच्या 'जेम्स सिम्पसन'ने त्याच्या घरी जेवणानंतर जमलेल्या पाहुण्यांना गंम्मत म्हणून क्लोरोफॉर्म हुंगायला दिला आणि सगळ्यांना झोपवलं. लगेच पुढच्याच आठवड्यात सिम्पसनने रुग्णांना क्लोरोफॉर्म द्यायचे यशस्वी प्रयोग केले. पुढे 'जॉन स्नो' ने इंग्लंडच्या राणीलाच तिच्या प्रसुती दरम्यान वेदना जाणवू नये म्हणून क्लोरोफॉर्म दिला..
मग काय! क्लोरोफार्मने सगळीकडे धुमाकूळ घातला.. आपल्याकडे पिक्चरमध्ये कोणाला बेशुद्ध करायचं म्हणलं की आजही क्लोरोफॉर्म दिलेला दाखवला जातो. वास्तविकतः त्याचा वापर बंद होऊन बरीच वर्षे झालीत..

कार्ल कॉलर या व्हिएन्नातल्या डोळ्याच्या डॉक्टरने सिग्मंड फ्राउड ने दिलेलं कोकेनचं सॅम्पल पेशंटच्या डोळ्यात टाकून 1884 मध्ये ऑपरेशन केलं आणि Topical anaesthesia चा शोध लागला.  मग याच दरम्यान जर्मनीच्या 'ऑगस्ट बायर'ने आणि त्याच्या असिस्टंटने हेच कोकेन एकमेकांच्या पाठीच्या मज्जारज्जू भोवती टोचून Spinal anaesthesia चा शोध लावला..  त्यानंतर Epidural anaesthesia, Peripheral nerve blocks यासारख्या भुलेच्या इतर प्रकारांचाही शोध नंतर लागला. सध्या पोटाचे आणि कमरेखालचे बरेच ऑपरेशन्स याच भुलेखाली केले जातात.

ईथर, क्लोरोफॉर्म च्या ऐवजी आता Isoflurane Sevoflurane Desflurane यासारखे सुरक्षित गॅस वापरले जातात. ते सुरक्षित आहेत, पण खूप महाग आहेत. आणि ते देण्यासाठीचे vaporizer ही महाग आहे. जुने Boyle's machine मागं पडून आता  Anaesthesia workstation हा आधुनिक प्रकार मोठ्या हॉस्पिटल्स मधून वापरणं सुरू झालं आहे..

या अनॅस्थेशीयाच्या शोधाअगोदर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेलतर एकतर त्या रुग्णाला चार दणकट माणसं धरुन ठेवत किंवा त्याच्या डोक्यात मारून त्याला बेशुद्ध केलं जाई किंवा त्याला भरपूर दारू/अफू/मँड्रेक दिलं जाई.. पण हा सगळा मामला बेभरवशाचा असे. मध्येच शुद्धीवर येऊन रुग्ण गुरासारखा ओरडत असे. भुलीची अशी 'खौफनाक' परिस्थिती असल्याने त्याकाळी ऑपरेशन्स पण मर्यादित होत असत. केवळ गॅंगरीन झालेले हात पाय कापणे, युद्धातल्या जखमांसाठीचे ऑपरेशन करणे वगैरे जीव वाचविण्यासाठी इतपतच सर्जरी फील्ड मर्यादित होतं. अगदी जीवावर बेतल्याशिवाय कोणीही स्वतःवर सर्जरी करून घेत नव्हतं.. पण जसजसं खात्रीलायक भुलेच्या औषधांचा शोध लागला आणि हे शास्त्र विकसित होत गेलं, तसतसं सर्जरीने पण झेप घेतली.. आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लीलया पार पडतात याचे श्रेय निश्चितच (खात्रीलायक असलेल्या आणि जास्तीत जास्त अचूकतेकडे गेलेल्या) अनेस्थेशीयाला आहे.

रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याचा श्वास बंद पडलेला असतो, तेंव्हा भूलतज्ञच कृत्रिम श्वास देऊन त्याच्या जीवनरथाचा सारथी बनलेला असतो. आणि रुग्णाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी झगडत असतो. पण रुग्णांच्या लेखी तो 'गुमनाम'च असतो.. भुलतज्ञांचे काम रुग्ण बेशुद्ध करून सुरू होते आणि रुग्ण व्यवस्थित भानावर येईतो तो रुग्ण ऑपरेशन थिएटर बाहेर काढला गेलेला असतो. म्हणून कित्येकांना आपलं ऑपरेशन कोणत्या डॉक्टरनं केलं त्यांचं नाव तर माहीत असतं, पण भूल कोणत्या डॉक्टरांनी दिली होती, हे मात्र बऱ्याच जणांना सांगता येत नाही.. मला सांगा, किती जणांना आपल्या भुलतज्ञाचं नाव माहिती आहे.?  आणि ऑपरेशन नंतर कितीसे पेशंट "मला ऑपरेशनच्या वेदना जाणवू न देणाऱ्या भुलतज्ञाचे आभार" अशा शब्दांत भावना व्यक्त करतात बरं.?!  याची उदाहरणे असतीलच तर ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच!!

हे झालं सामान्य जनतेचं.. पण मेडिकल फिल्डमध्ये पण याबाबत काही वेगळी परिस्थिती नाही.. कुठल्याही CME अथवा Conference मध्ये एखादी सर्जिकल केस प्रेझेंट केल्यानंतर कितीसे सर्जन्स "I could do all this because of my anaesthesiologist and his excellent anaesthesia" असं एका वाक्यात कृतज्ञ राहतात बरं.?!

  आपण आपल्यासाठी अन्न निर्माण करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञ असतो, सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल हळवे असतो, पण आपल्याला ऑपरेशन दरम्यानच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानायचे असतात, याबाबतीत मात्र एकंदरीत समाजातच उदासीनता दिसून येते.. यावर वर्तमानपत्रात ना वाचकांचे लेख येतात.. ना कुठे भुलतज्ञाचा सत्कार होतो.. ना इतर डॉक्टरांसारखी प्रसिद्धी कोणा भूलतज्ञाच्या नशिबी असते..
असो..

भुलतज्ञ होण्यासाठी MBBS नंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (MD) आहे. यात रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यापासून ते बाहेर काढेपर्यंत त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, त्याचा बीपी कंट्रोल करणे, त्याचे मेंदू/किडनी/लिव्हर यांच्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे, सगळ्या सिस्टिम्सची काळजी घेणे आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवणे याचं अत्यंत क्लिष्ट शिक्षण अंतर्भूत आहे. त्यात Critical care आणि Pain management ही आहे..
पण एकंदरीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा भुलशास्त्र विषय घेण्याकडे ओढा तसा कमीच असतो. कारण एकतर प्रसिद्धी मिळत नाही, त्यामानाने मोबदलाही मिळत नाही, पण उलट रिस्कचे आणि स्वतःवर येणाऱ्या स्ट्रेसचे प्रमाण खूपच जास्त असते!! असो..

पण काहीही असलं तरी एक मात्र खरं की, इतर सगळे डॉक्टर्स हे जरी पेशंटला 'आजारातून बरं करणारे' असले तरी, - भुलेदरम्यान पेशंटला जगण्या मरण्याच्या सीमारेषेवर सहजगत्या ठेवणारे.. पेशंटला मरणाच्या दारातून खेचून आणू शकणारे.. आणि पदोपदी पेशंटच्या आणि साक्षात यमाच्या मध्ये उभा राहणारे मात्र, फक्त आणि फक्त 'भुलतज्ञ'च असतात..

अशा या पडद्यामागच्या हिरोंचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे..

या जागतिक भूलदिनाच्या सर्व मानवजातीला शुभेच्छा!!
FOR VIDEO SUBSCRIBE OUR CHANNEL


**

 
Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying