मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे

शेतकऱ्याची हुशार सून कोण ?

 मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे ही सांगणारी  बोधकथा 

मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे



एक होता शेतकरी, त्याला तीन मुले. तिघांची लग्ने होऊन सुना घरी आल्या होत्या. त्याची शेतीवाडी खूपच मोठी होती. त्यामुळे तो विचार करत होता कि, या सगळ्या शेतीवाडीचा कारभार कुठल्या सुनेकडे सोपवायचा ?

 एक दिवस त्याने तिन्ही सुनांना बोलावून त्यांच्या हातात एकेक गव्हाचा दाणा दिला आणि सांगितले , " हा प्रसादाचा दाणा आहे.नीट जपून ठेवा. मी परत मागेन तेव्हा द्या. " मोठ्या दोन्ही सुना दाणा घेऊन गेल्या व आपापल्या दागिन्याच्या डब्यात तो दाणा त्यांनी जपून ठेवला. 

धाकट्या सुनेने विचार केला कि सासऱ्यांकडे मोठी तिजोरी आहे. तिथे दाणे न ठेवता ते आपल्याकडे कशासाठी दिले असतील ? थोडा विचार करून ती परसात गेली. तिथे तुळशी वृंदावन होते. त्याच्याजवळ तो दाणा जमिनीत पुरून तिने पाणी घातले. रोज ती तुळशीची पूजा करायची तेव्हा त्या दाण्याला पाणी घालायची.

तिथे तो दाणा रुजला. छान रोप तयार झाले. ते मोठे झाले त्याला एक घोसदार कणीस लागले. दाणे चांगले भरले. त्या कणसातून ओंजळभर गहू मिळाले. तिने परसात एक वाफा तयार केला व त्यात ते सर्व गहू पेरून टाकले. गव्हाचे छोटे शेतच , दुसऱ्यावर्षी त्यातून पोतेभर गहू मिळाले. मग तिने नवऱ्याशी बोलून आपल्या शेतातला एक तुकडा हे प्रसादाचे गहू लावण्यासाठी मागून घेतला. 

अशी ७-८ वर्षे उलटली. एके दिवशी शेतकऱ्यानी तिन्ही सुनांना बोलावून गव्हाचा दाणा द्यायला सांगितले. एव्हाना तो दाणा किडून गेला, त्याचा भुसा झाला, तो किडा मुंग्यांनी खाऊन टाकला होता. मोठ्या दोघी सुना काही दाणा आणू शकल्या नाहीत. धाकटी सून म्हणाली " प्रसादाचा दाणा आणायला १० बैलगाड्या लागतील. " एका दाण्याचे इतके दाणे झाले होते. शेतकऱ्याने धाकट्या सुनेकडेच सारा कारभार सोपवला.

 तात्पर्य : देवाने प्रत्येकाला काही न काही देणगी दिली आहे. कुणाला छान कुणाला चित्रकला येते. कुणाला उत्तम स्मरणशक्ती आहे तर कुणाला उत्तम शरीरसंपदा. देवाने दिलेली देणगी जर नीट वापरता आली नाही तर निरुपयोगी होते. देवाच्या देणगीचा चांगला वापर केला, त्याचा विकास केला तर माणूस मोठा होतो.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying