जागतिक काचबिंदू सप्ताह 7 मार्च ते 13 मार्च
दरवर्षी काचबिंदु बाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक काचबिंदू संघटनेतर्फे जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येतो.
यावर्षी हा सप्ताह 7 ते 13 मार्च दरम्यान साजरा करण्यात येत आहे. मुख्यतः चाळीशी पार केलेले व्यक्तींना काचबिंदुचा धोका संभवतो याचे वेळेत निदान न झाल्यास उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. मात्र, पूर्वनिदान झाले , वेळेत व नियमित औषधोपचार केले तर दृष्टीचे रक्षण करता येते.
काचबिंदूची लक्षणे लवकर आढळून येत नाहीत. मात्र, जेव्हा ती आढळून येतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे यास ‘सायलंट थीफ ऑफ व्हिजन’ असेही म्हणतात.डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणार्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी हळू-हळू अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. जर काचबिंदूचे वेळेत निदान झाले नाही तर कायमचे अंधत्व देखील येऊ शकते.काचबिंदुचे निदान करण्यासाठी इंट्राऑक्युलर प्रेशर’ तपासणे आवश्यक आहे.
हे 10 ते 21mmhg च्या दरम्यान असतो जर हा दाब अधिक असेल तर काचबिंदू होण्याची शक्यता असते. याशिवाय काचबिंदुचे निदान करण्यासाठी विविध तपासण्या देखील करण्यात येतात. त्यामध्ये ओसीटी, फिल्ड टेस्टिंग, ऑपॅथलमोस्कोपी टेस्ट, फंडस फोटोग्राफी आदी चाचण्या असतात.यावर्षीची काचबिंदु सप्ताहाची संकल्पना एक आशा की लोक नियमीत नेत्रतपासणीने आपल्या सभोवतालचे जग कायम पाहू शकतील जे सौंदर्याने,मोहकतेने आणि साहसीपणाने परिपूर्ण आहे.म्हणून जग उज्ज्वल आहे, आपले दृष्टी वाचवा ही आहे.
काचबिंदुची लक्षणे
* धुसर दिसणे.
* प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे.
* डोकं आणि डोळे दुखणे व उलटी होणे
* वरील लक्षणे वारंवार आढळून येणे
* हळूहळू दृष्टी कमजोर होणे
संभावित रूग्ण
* घरात कुणाला काचबिंदू असेल तर
* स्टिरॉईड ड्रॉप्स वा संप्रेरकाचे सेवन केले तर
* मोठा मायनस नंबर म्हणजे मायोपिया असेल तर
* मधूमेह व उच्चरक्तदाबग्रस्त व्यक्ती
* डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर
* मोतिबिंदूकडे दुर्लक्षित केल्यास
* सुडोएक्सफोलेशन सिन्ड्रॉम असेल तर
* पिगमेंट डिस्परशन सिन्ड्रॉम असेल तर
काचबिंदूमुळे गेलेल्या दृष्टीला परत मिळविता येत नाही. जेवढी दृष्टी असते, तेवढ्याची रक्षा करणे अत्यावश्यक असते. अन्यथा पूर्णपणे अंधत्व देखील येऊ शकते.म्हणून जेवढ्या लवकर निदान तेवढी जास्त प्रमाणात दृष्टी वाचण्याची शक्यता असते त्यामूळे घरात कुणाला काचबिंदू असेल, मधूमेह-उच्चरक्तदाबादी विकार असतील अथवा चाळीशीनंतर काचबिंदूचा धोका जास्त असतो. अशा वेळी डोळ्यांची नियमित तपासणी करावी. वर्षातून एकदा केलेल्या चाचणीतून काचबिंदूची लक्षणे आढळून आली, तर त्यावर नियंत्रण मिळविता येते आणि दृष्टीची रक्षण करता येते.यासाठी लोकांमध्ये नेत्रतपासणीसाठी जनजागृतीची आवश्यकता आहे आणि ती करण्यासाठी आपण सर्व कटिबध्द आहोत त्यासाठी आपणां सर्वांना जागतिक काचबिंदू सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा .
OPTOMETRY-SHARP VISION
Optometrist