बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम


खरं म्हणजे माणूस गेल्या दहा लाख वर्षांपासून या पृथ्वीवर चालतो आहे आणि तरीही जन्माला आल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला पडत-झडत चालणं शिकावं लागतं. सुरुवातीला लहान मुलांना चालणं शिकण्याकरता आपण पांगुळगाडा देतो. वऱ्हाडी भाषेमध्ये याला गुडगुडी म्हणतात. समजा, एक मूल पांगुळगाडा चालवता चालवता धपकन पडलं. याच्या आईची मन:स्थिती चांगली नाही. घरामधलं वातावरण चांगलं नाही. सासू सारखी घालून पाडून बोलत असते. 

नवरा दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे ही बाई खऱ्या अर्थानं अतिशय वैतागलेली आहे. त्यातल्या त्यात तब्येत चांगली राहत नाही. अॅनिमिक आहे. त्यामुळे सतत चिडलेली असते. अशा अवस्थेमध्ये या स्त्रीचा संताप आणि चिडचीड मात्र मोठ्या माणसांबाबत निघू शकत नसल्यामुळे स्वाभाविकच ती सारखी लहान मुलांवर निघत असते. या बाईला खरं म्हणजे वेदना झालेल्या असतात, की आपलं मूल पडलेलं आहे, त्याला लागलेलं आहे आणि तरीही आपल्या वेदना ती कशा वेगळ्या पद्धतीनं व्यक्त करते ? धावत येते आणि आल्याआल्या मुलाला उचलून घेण्याच्या आधी त्याच्या पाठीत धपाटा घालते. 

'मेल्या, नालायका, हलकटा, मी तुला सांगितलं होतं नं जागेवरनं हलू नकोस, काही गरज होती का पांगुळगाडा चालवण्याची, सारखा मेला दिवसभर धडपडत असतो, काहीतरी करत असतो, सारखा पडत असतो आणि रडत असतो,' केवळ असं म्हणून ती थांबत नाही, तर पुन्हा पाठीत दुसरा धपपाटा घालते. 'मेल्या, नालायका, हल्कटा, आयुष्यभर पडत राहा आणि रडत राहा' असा आशीर्वाद देऊन मोकळी होते. हा प्रसंग मी माझ्या आयुष्यामध्ये, किमान सात-आठ स्त्रियांना तरी आपल्या मुलांबाबत वागताना पाहिलेलं आहे.


माझ्यापेक्षा कदाचित तुम्ही अनेकदा हा प्रसंग पाहिलेला असेल, कल्पना करा, तीन-चारदा जर हा प्रसंग या मुलाच्या आयुष्यामध्ये repeat झाला. 'मेल्या, नालायका, हलकटा, आयुष्यभर पडत राहा आणि रडत राहा' या पद्धतीची वाक्यं तो ऐकत गेला तर काय होईल? एक वाक्य माझं आयुष्यभर लक्षात ठेवा, कारण ते अत्यंत मौल्यवान आहे, 'जसं आपण स्वतःला आतून समजतो तसंच आपण दिवसेंदिवस घडत जात असतो. हा मुलगा जर स्वतःला या पद्धतीनं समजत असेल, की 'मेल्या आयुष्यभर पडत राहा आणि रडत राहा' तर एक पराभूत मनोवृत्तीचं व्यक्तिमत्त्व या मुलामध्ये निर्माण होईल.


आता समजा, हे मूल उद्या मोठं झालं. वीस वर्षांचं झालं, कॉलेजमध्ये शिकतंय. त्याच्या शेजारच्या बाकड्यावर एक सुरेख छोकरी बसते. हा सारखा तिच्याकडे पाहत असतो. तिही अधूनमधून याच्याकडे नेत्रकटाक्ष टाकत असते आणि त्यातून हा तिच्या प्रेमात पडतो, तिला न विचारताच. 

आपला बसल्याजागी छान तिच्यावर प्रेम करायला लागतो. तिच्यावर कविता लिहायला लागतो; आणि मग एक दिवस त्याला कळतं, ही मुलगी दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात आहे. झालं! याचा प्रेमभंग होतो. याच्या हृदयाचे हजारो तुकडे होतात. हे तुकडे जिकडे-तिकडे पसरतात आणि मग हे महाशय सहगलची आणि मुकेशची रडकी गाणी ऐकत ऐकत आपल्या हृदयाचे तुकडे रात्रंदिवस गोळा करत राहतात. स्वतःचा पार देवदास करून टाकतात. मी किती दुःखी आणि माझं दुःख किती महान असं करत बसतात. या पद्धतीनं एक पराभूत मनोवृत्तीचं आयुष्य ही माणसं पुढच्या आयुष्यामध्ये जगत जातात. ही माणसं जर उद्या आयुष्यामध्ये अधिक मोठी झाली - कदाचित ते


बऱ्यापैकी ठिकाणी काम करत असतात. बऱ्यापैकी पदावर सुद्धा असू शकतात? तरी या माणसांचा Tone मात्र कायम असतो. इतर माणसांना कदाचित ही माणसं यशस्वी आहेत असं वाटत असतं. आपण जर यांना विचारावं, 'काय म्हणतं तुमचं ऑफिस?' तर हे म्हणतील, 'अरे, काय विचारतो ऑफिसचं! असा नालायक बॉस माझ्या वाट्याला आलाय की नाही, की माझं आयुष्यच जगणं असह्य झालंय.

 'जाऊ द्या हो, असतो आपला बॉस कधी कधी नालायक; पण वहिनी तर चांगल्या आहेत नं! म्हणजे तुमच्या पत्नी.' 'काय म्हणता? तुम्हाला माहीत की मला माहीत?' 'नाही हो, तुम्हालाच माहित.' 'अरे, मग मी सांगतो नं! त्या तुकारामाला सुद्धा चांगली बायको मिळाली होती, एवढी कजाग बायको नव्हती ती. त्याहीपेक्षा कजाग बायको माझ्या वाट्याला आलीय.' मुलांबद्दल विचारावं तर, 'असली नालायक पोरं जन्माला नसती आली तर बरं झालं असतं.'


ही माणसं सातत्यानं दुसऱ्यांविषयी तक्रार करत असतात. हा अस्सा नालायक आहे, तो तस्सा वाईट आहे, तो तस्सा हलकट आहे या पद्धतीनं बोलत असतात आणि मनातल्या मनात मी अस्सा नालायक आहे असं स्वत:लाच सांगत असतात. या पद्धतीच्या पराभूत मनोवृत्तीच्या माणसांचा संपूर्ण भाग व्यक्तिप्रसंगांमधून निर्माण होत असतो, पाया घातला जात असतो. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे.


आपण असं गृहित धरूया, की दुसऱ्या मुलाबाबत काही वेगळ्या पद्धतीन घडलं तर काय होईल? हे मूल चालता चालता, पांगुळगाडा चालवता चालवता धपकन पडलं. ओक्साबोक्शी रडायला लागलं. आई धावत आली. या आईची मन:स्थिती चांगली आहे. तिला बालसंगोपन कसं करावं याचं थोडंबहुत भान आहे. ही आई काय करेल? या मुलाला उचलून कडेवर घेईल. रडणाऱ्या मुलाचं लक्ष कोणत्यातरी आनंदाच्या गोष्टीकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. कदाचित ती त्याला उडणारे रंगीबेरंगी पक्षी दाखवेल. 

कदाचित आवाज करणाऱ्या खेळण्यांकडे त्याचं लक्ष वेधून घेईल. थोड्याच वेळात या मुलाचा interest. त्यामध्ये निर्माण होईल. हे मूल त्या खेळण्यांमध्ये गुंगून गेल्यानंतर आपलं रडणं विसरेल. हसणाऱ्या खिदळणाच्या मुलाला ती कदाचित उचलेल, पांगुळगाड्याच्या आधारानं उभं करेल, एक-दोन पावलं चालण्याकरता मदत करेल आणि त्यानंतर सोडून देईल. थोड्याच वेळात हा मुलगा स्वतः तो पांगुळवाडा हसत-खिदळत चालवत राहील.


हा प्रसंग जर या मुलाच्या जीवनामध्ये तीन-चारदा repeat झाला, तर काय संस्कार होईल? ज्यावेळी आपण एखादी कृती करत असतो आणि ती कृती करताना आपल्याला अपयश येतं, आपल्याला दुःख होतं, वेदना होतात, त्यावेळी जर अधिक आनंदाच्या गोष्टींकडे आपण आपलं लक्ष वेधून घेतलं तर आपलं दुःख आपल्याला विसरता येतं, रडणं थांबवता येतं, आनंदानं हसता येतं. एवढंच नव्हे, तर जी कृती करताना आपण अपयशी झालो होतो तीच कृती पुन्हा यशस्वीपणे पार पाडता येते. या पद्धतीचा एक संस्कार या मुलाच्या मनावर अंतर्मनावर कोरला जातो.


या पद्धतीचा यशस्वितेचा संस्कार घेतलेला मुलगा वयाच्या विसाव्या वर्षी एका मुलीच्या प्रेमात पडला. हाही तिला न विचारताच आपोआप एकतर्फी प्रेमात पडला आणि पुढे जर त्याला कळलं, की ही मुलगी दुसऱ्याच कुणाच्या प्रेमामध्ये आहे, तर हा मुलगा कधीही तिच्या मागे कपडे फाडणार नाही. कदाचित त्याला थोडंसं वाईट वाटेल; पण हा विचार करेल, की ठिक आहे. 

माझ्यापेक्षा कुणीतरी तिला अधिक आवडलं. तिला शेवटी त्याच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे. म्हणून हा मोठ्या मनानं म्हणेल, 'जा बाई, दिल्या घरी तू सूखी राहा' आणि एवढ्यावरच तो थांबणार नाही, तर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा स्वतःचा antenna काढेल आणि आपल्याला कोण आवडतं, कोण आपल्या हृदयामध्ये बसणारं मिळतं, कोण आपल्याला प्रतिसाद देतं, म्हणून नव्या पात्राचा शोध घेत जाईल. केवळ आपल्या हृदयाचे तुकडे करत बसणार नाही आणि ते गोळा सुद्धा करत बसणार नाही.


'अपयशाने खचून न जाता, यशाच्या दिशेनं कशी वाटचाल करायची' हा जो संस्कार त्याच्यावर झालेला आहे त्याचा फायदा त्याला आयुष्यभर मिळत राहतो. अशा मनोवृत्तीचा माणूस जर कधी रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला. आता रस्त्यानं चालताना पाय घसरून पडणं स्वाभाविक असतं. अरे, माणसं इथे तर गादीवर झोपल्या झोपल्या पडतात, तर रस्त्यावरून चालताना पडणं काय विशेष आहे. 

त्यामुळं स्वाभाविकच जर हा माणूस कधी रस्त्यावरून पडला, तर आपण आजूबाजूला असणारी माणसं खदखदून हसायला लागतो. हा मात्र छानपैकी आपले कपडे झटकत झटकत उभा राहतो. सगळ्या हसणाऱ्यांकडे पाहून छानपैकी एक सुंदर स्मित करतो. आपल्याला वाटतं आपल्या मुस्काटातच मारली. या पद्धतीनं जणू काही घडलंच नाही असं समजून पुन्हा हा रस्त्यानं चालायला लागतो. या पद्धतीच्या माणसांचं एक वैशिष्ट्य असतं. ही माणसं जर एखाद्या मोठ्या खड्डयामध्ये जरी पडली, तरीही त्यातून ताकदीनं बाहेर येतात. 

स्वतःला स्वच्छ करतात. असेल नसेल तो सगळा चिखल काढून टाकतात आणि अतिशय उत्तम पद्धतीनं पुन्हा त्याच रस्त्यानं चालायला लागतात. जुने खड्डे चुकवत चुकवत सातत्याने यशच पादाक्रांत करत जातात. कारण या माणसांच्या जीवनामध्ये येणारं अपयश म्हणजे एखादा अडथळा असतो. काही अडथळे मामुली असतात. काही अडथळे प्रचंड मोठाले असतात. काही अडथळे अतिशय difficult असतात; पण ते अडथळे असतात आणि त्यांच्यावर मात करता येते, असा आत्मविश्वास बाळगून ही माणसं आयुष्यभर वाटचाल करत असतात आणि सातत्यानं यशस्वीच बनत असतात. 


(अ) लहानपणी भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग


साधारणत: आपण असं मानतो, की धार्मिक संस्कार किंवा देवासंबंधीचे संस्कार मुलांवर करणं हे अतिशय उत्तम आहे. खरंच आहे का ? समजा, एखादी आई बालवाडीमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला सांगते,


की 'बाळा रे, उद्या तुझी परीक्षा आहे नं! देवापुढे जा, देवाला नमस्कार कर आणि देवबाप्पाला सांग, मी जर परीक्षेमध्ये चांगला पास झालो नं तर तुला पाच रुपयांचे पेढे देईन.' खरं म्हणजे हा मुलगा अतिशय धार्मिक पद्धतीच्या संस्कारांमुळे, आईने सांगितलेलं आहे म्हणून अतिशय आत्मीयतेनं देवाला जाऊन हे म्हणेल; आणि उद्या जर हा मुलगा खरंच पास झाला तर आई त्याला पाच रुपयाचे पेढे आणायला सांगेल. तो देवापुढे ठेवेल. अर्थात, देव खाणारच नाही. त्याच्या नावावर बाकीचेच सगळे खातील. हा संस्कार चांगला आहे का?


हळूहळू या मुलाला कळायला लागेल, की आपल्या KG-1 च्या शिक्षणाकरता काही हजार रुपये खर्च झालेला आहे. त्याची सांगता करणारी जी परीक्षा आहे, ती पास होण्याकरता जर देवाला आपण पाच रुपये दिले तर आपण परीक्षा पास होऊ शकतो. या पद्धतीचा संस्कार झालेला मुलगा उद्या कदाचित Engineer/Contractor होईल आणि मग एखादं contract sanction करून घेण्याकरता, लाखो रुपयांचं contract जर असेल तर हा sanction करणाऱ्या अधिकाऱ्याला सहजतेनं त्यातले चार-पाच लाख रुपये काढून द्यायला तयार होईल.


पाच रुपयाच्या मोबदल्यामध्ये हजारो रुपये मिळवण्याचा संस्कार बालपणापासूनच त्याच्यावर झालेला आहे. या पद्धतीचा संस्कार बालपणापासून आपल्या देशात होतो, म्हणूनच आपल्या देशामध्ये भ्रष्टाचाराची गंगोत्री निर्माण झाली आहे. कोणतंही पाप करा, गंगेमध्ये आंघोळ करा. एवढंच नव्हे, तर ब्राम्हणाला दक्षिणा द्या आणि त्या पापातून मुक्त व्हा. यातून दुसऱ्या कोणत्या पद्धतीचा संस्कार निर्माण होणं शक्य आहे?


"आवळा देऊन कोहळा काढण्याचा' हा संस्कार कधीही चुकून आपल्या हातून घडता कामा नये. एखाद्याला जर देवावरचे संस्कार करणं अत्यंत मौल्यवान वाटतच असेल, तर वेगळ्या पद्धतीने, जर या मुलाला त्याच्या आईने सांगितलं, की 'जा रे, देवाला साकडं घाल.' तर याला psychological अर्थ आहे. त्याने जो जो अभ्यास केला, तो त्याला नीट आठवेल. हा आत्मविश्वास जर त्याच्या मनामध्ये निर्माण झाला तर psychologically तो परिणाम त्याला मिळू शकतो आणि खरोखर तो उत्तम पद्धतीनं पेपर सोडवू शकतो. यातून कोणताही चुकीचा संस्कार त्याच्या मनामध्ये निर्माण न होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे psychology- 'मानसशास्त्र' हे दुधारी शस्त्र आहे. त्याचे काही वाईटही परिणाम होऊ शकतात काही चांगलेही परिणाम होऊ शकतात. म्हणून आपल्याला त्याबाबत अतिशय जागरुक राहून ते संस्कार करावे लागतात.


(ब) “तुला जमिनीनं मारलं? थांब, मी तिला मारते!" 

एखादं मूल खाली पडलं, की अनेक आई-वडील त्या जमिनीलामा रतात, 'तुला या जमिनीनं मारलं काय? आता मी जरा दोन मारते.' आईने दोन मारले की मूलही खुश होतं, की चला जमिनीला मारलर; पण यातून, तो चालत असताना त्याच्या चुकीमुळे तो पडलेला आहे हे मात्र त्याला कळत नाही; आणि मग यातून एक मनोवृत्ती निर्माण होऊ शकते, की आपल्या आयुष्यामध्ये ज्या चुका होतात त्या जरी स्वतःच्या असल्या तरी त्याचं दोषारोपण मात्र दुसऱ्या कुणावर तरी करायचं, जसं आईनं त्या जमिनीवर केलं होतं त्या पद्धतीनं करायचं. या पद्धतीचा संस्कार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे संस्कार करताना अतिशय जागरुकतेनं आपल्याला संस्कार करावे लागतील हे आपण समजून घेतलं पाहिजे.


(क) सांताक्लॉजही मुलांना बिघडवू शकतो?


ख्रिश्चैनिटीमध्ये सांताक्लॉजची कल्पना अशी आहे, की ख्रिसमसच्या काळामध्ये एका विशिष्ट दिवशी सांताक्लॉज येतो आणि त्या त्या मुलांच्या लायकीप्रमाणे त्यांना खेळणी देतो. समजूत अशी निर्माण केली जाते, की सांताक्लॉज हा उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर राहणारा एक म्हातारा गृहस्थ! त्याला मुलं कशी वागतात हे नीट कळत असतं आणि त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना तो खेळणी देतो. खरं म्हणजे हा सगळा सोपस्कार कळत-नकळत आई-वडीलच उपचार म्हणून पाळत असतात. तेच एखादं खेळणं बाजारातून विकत आणतात.


मूल झोपलं की त्याच्या उशाशी ते नेऊन ठेवतात. जेणेकरून सकाळी उठल्या उठल्या त्या मुलाच्या दृष्टीस ते खेळणं पडतं आणि ते खेळणं पाहिल्याबरोबर हे मूल अतिशय आनंदानं धावत पळत आई-वडिलांकडे येतं. त्यांना सांगत, की मला सांताक्लॉजनं या या पद्धतीचं खेळणं दिलं! इथपर्यंत छानपैकी संस्कार होतो असं आपल्याला म्हणता येतं.


त्या मुलाच्या सद्गुणांची नोंद सांताक्लॉजनं घेतली आहे असं आपल्याला वाटेल; पण मग काय होतं, की सगळी मुलं एकत्र जमतात. प्रत्येकजण त्याला सांताक्लॉजनं कोणकोणतं खेळणं दिलं याबद्दल चर्चा करतात. 

एक-दुसऱ्याला दाखवतात. त्यामध्ये कदाचित एखादा पोरगा बदमाश असतो. जो नेहमी इतरांना मारत असतो. इतरांचे खाऊ हिसकावून घेत असतो. दृष्टपणा करणारा असतो; पण तो घरचा श्रीमंत असतो. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याच्याकरता अतिशय उंची आणि सुंदर खेळणं आणलेलं असतं. मग बाकीच्या मुलांना वाटतं, की आपण एवढे चांगले वागतो तरी आपल्याला मात्र हे साधं खेळणं, हा इतका वाईट वागतो तरी याच्याकरता सुंदर खेळणं. म्हणजे सांताक्लॉजच्या दृष्टीनं ह्या मुलाचं वागणं हे बक्षिसपात्र आहे. या पद्धतीची समजूत जर या मुलांमध्ये झाली, तर मात्र त्या मुलाचं ते अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. या पद्धतीनं हा संस्कार वाईट पद्धतीचा निर्माण होऊ शकतो. त्यामुळं नेहमीच बालपणामध्ये संस्कार करताना फार काळजीपूर्वक संस्कार करावे लागतात.


(ड) 'चूप बैस' संस्कृती


'मुलांना काही अक्कल नसते, कळत नाही' असं गृहीत धरून आपण वागत असतो. मुलांनी काही विचारलं तर, 'ऐ, गप्प बस. तुला काही कळत नाही, मी सांगतो ते ऐक,' असं म्हणायचं. म्हणजे एक तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. त्यांना सतत गप्प बसवायचं आणि सातत्यानं त्यांना ऐकवायचं, की 'तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही, मी मोठा आहे. मला जास्त कळतं आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू ऐक.' अशा 'चूप बैस' संस्कृतीमधून निर्माण झालेली मूलं. त्यांची निर्णयशक्ती मात्र मुळीच त्यामुळं develop होऊ शकत नाही आणि मग परिणामतः ती वयाची पाच वर्ष पूर्ण करून सहाव्या वर्षामध्ये शिरायला लागली, की त्यांची critical Faculty निर्माण होते. म्हणजे थोडक्यात, आपण मघा पाहिलं, की मेंदूला झाकण नसतं, ते झाकण येतं. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हा अधिकार त्यांना निसर्ग बहाल करतो.


'चूप बैस' संस्कृतीनुसार जर आपण मुलांना वाढवलेलं असेल, तर त्यांच्यामध्ये ही निसर्गानं बहाल केलेली स्वातंत्र्याची गोष्ट वापरण्याविषयीचा आत्मविश्वासच नसतो. म्हणून मग आपल्या इथे वीस-पंचवीस वर्षांची मुलं झाली तरी स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाहीत; आणि आपल्या इथे अत्यंत उच्चविद्याविभूषित झालेली पंचवीस वर्षांची मुलगी सुद्धा स्वतःच्या लग्नाचा निर्णय स्वतः घेत नाही. या पद्धतीनं एक परावलंबी मनोवृत्ती पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकते.


जगभरचे मानसशास्त्रज्ञ सांगतात, की लहानपणापासून निर्णयशक्ती develop करण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे, मुलांना प्रोत्साहित केलं पाहिजे; आणि ते छोट्या छोट्या गोष्टींमधून करता येतं. 'अरे बाळा, तुला अर्धा ग्लास दूध हवंय की एक ग्लास दूध हवंय.' बाहेर जाताना मुलांनी विचारलं की कोणते कपडे घालू? तर सरळ सरळ 'अरे बाळा, तुला ही लाल पँट छान दिसते, ही काळी पँटही छान दिसते. 

कोणती घालायची तूच आरशासमोर उभं राहून ठरवं.' या पद्धतीनं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर त्यांना निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित केलं, स्वावलंबी बनण्यासाठी प्रोत्साहित केलं, तर कदाचित त्यांच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण होईल, की आपण आपले निर्णय स्वतः घेऊ शकतो. मग पाचव्या-सहाव्या वर्षामध्ये त्यांना निसर्गानं बहाल केलेली 'Critical Faculty' (निर्णय स्वातंत्र्य) अधिक उत्तमपणे वापरता येईल? आणि स्वावलंबी त्यातून मुलं निर्माण होतील.


बालसंगोपन कसे करावे ?

बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

 बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?

बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम

बालसंगोपन 6 : तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying