बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी


'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी' ही म्हण आपल्या भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. 'ज्या आईच्या हातामध्ये पाळण्याची दोरी असते, म्हणजे जी मुलाला जन्माला घालते; त्याच्यावर संस्कार करते; तीच संपूर्ण जगाचा उद्धार करू शकते, या अर्थाने ही म्हण वापली जाते. याचा नेमका अर्थ, जे काही महापुरुष या जगामध्ये जन्माला आलेले आहेत त्या सगळ्यांना घडवण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्या आईने केलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

 दुसरी एक म्हण आपण वापरतो - 'कुंभार मातीचं मडकं घडवतो, तसं माणसाचं व्यक्तिमत्त्व घडत असतं.' आता हे खरंय, की कुंभार मातीचा एक ओबड-धोबड गोळा घेतो, त्याला चाकावर फिरवतो आणि त्याला एक सुरेख आकार निर्माण करून देतो. म्हणजे या मातीच्या ओबड-धोबड गोळ्यामधून एक सुरेख मडकं तो निर्माण करू शकतो. 

दुसऱ्या आकाराचं कोणतंतरी भांडं निर्माण करू शकतो. या अर्थानं संस्कारांमधून माणूस घडतो हे आपल्याला म्हणायचं असतं आणि त्यामागे निश्चित असं एक सत्य दडलेलं आहे. आजच्या अलीकडच्या काळाच्या अभ्यासामधून आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात येतात. त्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल, तर आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया बालपणामध्ये घातला जातो, हे आज आपल्या कळायला लागलेलं आहे..


या शतकामध्ये या विषयाची जागरुकता प्रचंड वाढली आहे आणि त्याचं कारण आहे 'मानसशास्त्राचा अभ्यास'. ज्यावेळी मोठ्या माणसांच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या या का निर्माण झाल्या? कशा निर्माण झाल्या? केव्हा निर्माण झाल्या? किंवा ज्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही (defects) कमतरता आहेत (Personality defects) व्यक्तिमत्त्वातील कमतरता आहेत, ते का निर्माण झाले? केव्हा निर्माण झाले ? आणि कसे निर्माण झाले? याचा शोध घेण्याचा जो प्रयत्न झाला, ज्याला आपण Psycho-analysis म्हणजे मानसशास्त्रीय विश्लेषण करणं असं म्हणतो, त्या माध्यमातून या मुद्यांचा शोध घेण्याच प्रयत्न झाला आणि त्यातून काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले. माणसाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जे दोष निर्माण होतात त्यामागे त्याच्या बालपणामध्ये झालेले काही चुकीचे संस्कार असतात असं तीव्रतेनं लक्षात आलं.

 म्हणूनच एकूणच बालपणाच्या संस्कारांना प्रचंड महत्त्व जगभर निर्माण झालं. या क्षेत्रामध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये जगभर प्रयोग सुरू आहेत. मुलांना कोणत्या पद्धतीनं वाढवलं पाहिजे? प्रत्येक बारीक-सारीक तपशीलामध्ये कोणकोणते विषय हाताळले पाहिजेत? कोणत्या प्रसंगामध्ये मुलांना कसं हाताळलं पाहिजे? या सगळ्यांच्या तपशीलामध्ये शिरता येईल एवढा प्रचंड अभस या क्षेत्रामध्ये झालेला आहे.


आजच्या काळामध्ये आपण बालसंगोपनावर प्रचंड लक्ष द्यायला लागलो आहोत. प्रामुख्यानं मध्यमवर्गीय आई-वडील याबाबत खूपच जागरुक झालेले आहेत. त्याची दोन कारणं आहेत. एक तर आपलं स्वतःचं शिक्षण वाढलं. शिक्षणासोबत मानसशास्त्रीय अभ्यासही वाढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं कुटुंब नियोजनामुळं मध्यमवर्गीयांमध्ये मुलांची संख्या कमी झाली.. स्वाभाविकच मुलांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे अधिक लक्ष देण्याची शक्यता निर्माण झाली. तशी गरजही आपल्यापैकी प्रत्येकाला वाटायला लागली. त्यामुळे आजच्या काळात प्रामुख्यानं मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये आई-वडील आपल्या मुलांबाबत प्रचंड जागरुक झालेले आहेत.


आपला खूप वेळ ते मुलांकरिता खर्च करतात. मुलांच्या वाढीकडे बारीक सारीक लक्ष पुरवतात.


याचे काही फायदे आहेत आणि तोटेही आहेत. काय होतं, की आपल्यापैकी अनेकांना आपल्या मुलांचं संपूर्ण आयुष्य घडवण्याचं सामर्थ्य आणि अधिकार आपल्यामध्ये आहे असं वाटायला लागतं. त्यामुळे कळत नकळत आपण त्यांचं संपूर्ण जीवनच नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला मनापासून वाटत असतं, की या मुलांना कसं घडवायचं ते आपल्याला ठरवता येतं आणि आपण ठरवू त्या पद्धतीनं ते घडत जाणार आहे. थोडक्यात, कळत-नकळत आपण स्वत: ब्रह्मदेवाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न करतो.


पण आपण समजून घेतलं पाहिजे, की जरी मुलांना वाढविण्याचे काही अंशी अधिकार आपल्या हातामध्ये असले, त्यांना उत्तम संस्कार उपलब्ध करून देण्याचे अधिकार आपल्या हातात असले, तशी संधी असली; तरीही त्यांचं संपूर्ण जीवन आपल्याला घडवता येत नाही. कारण मुलं शेवटी स्वतःच्या पद्धतीप्रमाणे वाढत जात असतात. त्यामुळे आजच्या काळामध्ये काही आई बाप त्यांचं संपूर्ण जीवन नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात त्यांचं जीवन आक्रसून टाकतात. हेही एका बाजून घडता कामा नये आणि दुसऱ्या बाजूनं आपल्या हातामध्ये जेवढे उत्तम संस्कार करण्याचे अधिकार आहेत किंवा त्या पद्धतीची संधी आहे, तिही आपण वाया घालवता कामा नये. या दोन्हींचं एक सुंदर combination निर्माण झालं पाहिजे. हे खरं आहे, की आपल्याला मुलांना फुलवण्यात, वाढवण्यात, त्यांना विकसित करण्यात, त्यांना स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचा वाटा उचलता येतो. आता मुलांना कशा पद्धतीनं वाढवता येतं? यातल्या तपशीलात न शिरता सुद्धा काही महत्त्वाचे मुद्दे आपण समजून घेणार आहोत.


बालसंगोपन कसे करावे ?

बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

 बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?

बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम

बालसंगोपन 6 : तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying