बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत


कॉम्प्युटरमध्ये दोन भाग असतात. एक हार्डवेअर आणि दुसरे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे आपला संपूर्ण शारीरक भाग. मेंदूचाही शारीरिक भाग हा निसर्गाच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये तयार होतो; पण यामध्ये Software मात्र मूल जन्माला आल्यानंतर, जन्माला आलेल्या क्षणापासून भरलं जातं आणि मग त्यातून आपलं संपूर्ण व्यक्तिमत्त्व निर्माण होतं.

थोडक्यात, आपण दुसरी उपमा पाहायचीच झाली, तर आपल्याला audio cassette ची ध्वनिफितीची उपमा देता येईल. बाजारामधून आपण एखादी ध्वनिफित विकत आणतो. समजा, ही फित जर कोरीकरकरीत असेल, तर या कोच्या फितीवर आपण ज्यावेळेस अतिशय उत्तम पद्धतीनं recording करतो, त्यावेळेस आपल्याला हवंय त्या पद्धतीनं recording होतं; पण ती बाजारातून आणलेली ध्वनिफित जर आपण केवळ कोऱ्या अवस्थेमध्ये वाजवून पाहिली, तर त्यातून कोणताही आवाज येणार नाही. 

कारण त्यावर काहीही record झालेलं नसतं, तरीही त्यामध्ये recording करून घेण्याची क्षमता असते. त्याच पद्धतीनं आपल्या मेंदूची अवस्था आहे. मूल जन्माला येतं त्यावेळेस त्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं programme करून घेण्याची क्षमता असते; पण प्रोग्रामिंगच्या अर्थानं म्हणजे Software च्या अर्थानं हा मेंदू कोरा असतो.

त्यानंतर पहिल्या पाच वर्षांपर्यंत या मुलांचा मेंदू अतिशय कार्यक्षम पद्धतीने भरला जातो. म्हणून असं मानलं जातं, की पहिल्या पाच वर्षांमध्ये आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला जातो. या काळामध्ये हा मेंदू जवळपास एखाद्या उघड्या डब्यासारखा असतो. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचा अधिकारच त्याला नसतो. 

आजूबाजूच्या परिसरामधून जे जे त्याच्या मेंदूमध्ये टाकलं जाईल ते ते तो जसंच्या तसं स्वीकारेल. म्हणजे काही चांगल्या गोष्टी त्याच्या मेंदूत टाकल्या गेल्या तर तो चांगल्या गोष्टी स्वीकारतो. घाण किंवा कचरा टाकला गेला तर घाण किंवा कचरा सुद्धा तो स्वीकारतो; आणि या पद्धतीनं त्याच्या हातामध्ये अधिकार नसताना त्याच्या उघड्या मेंदूमध्ये आजूबाजूच्या परिसरामधून जे जे टाकलं जाईल ते ते सगळं सामावत जातं. त्यातून programming होत जातं आणि त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला जातो. या पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्त्व घडतं.

हा संपूर्ण परिसर म्हणजे काय काय? आपल्यापैकी अनेक आई-बापांना असं वाटत असतं, की हा परिसर म्हणजे आपलं घर आहे. हे मात्र खरं नाही. आता एका बाजूनं हे निर्विवाद सत्य आहे, की आई-वडिलांचे सगळ्यात जास्त परिणाम मुलांवर होतात, असं मात्र नाही.

 म्हणजे मूल घरामध्ये जर आठ तास, दहा तास, पंधरा तास, सोळा तास राहत असेल तर पाच-सहा तास ते बाहेरसुद्धा राहतं. म्हणजे या घरामध्ये केवळ आई-वडील येत नाहीत तर त्यासोबत घरातले सगळेच्या सगळे सदस्य येतात. घरातली मोलकरीण, कदाचित तिचा जास्त सहवास त्या मुलासोबत येत असेल. एवढंच नव्हे, तर मूल आजूबाजूच्या मुलांमध्ये खेळतं.

 म्हणजे या घरामधून होणारे संस्कार, तो ज्या ज्या घरामध्ये जातो त्या घरांमधून होणारे संस्कार, तो ज्या सवंगड्यांसोबत खेळतो त्यातून होणारे संस्कार, घरात आतमध्ये येऊन बसलेला जो टी. व्ही आहे त्याच्या माध्यमातून होणारे संस्कार, या सगळ्या संस्कारांमधून एक संम्मिलीत संस्कार त्याच्यावर होतात आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. त्यामुळे या मुलाच्या सहवासात येणारं प्रत्येक माध्यम आणि प्रत्येक माणूस महत्त्वाचा ठरतो. कारण त्यामुळे कळत-नकळत त्याच्या संस्काराचा पाया, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घालत जात असतो.

सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या पाच वर्षांमध्ये आपल्या पाचही इंद्रियांच्या माध्यमातून हा मुलगा जे जे पाहतो, जे जे अनुभवतो, जे जे ऐकतो ते जसंच्या तसं स्वीकारत जातो आणि मोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे लहान मूल दोन माध्यमांतून स्वतःचं programming करून घेतं.

 आपल्या पाच इंद्रियांचा अनुभव आणि मोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न, यामुळे घरातली जी महत्त्वाची माणसं आहेत, ज्यांना तो मोठी माणसं समजतो, त्यांच्या वागण्याचाही कळत-नकळत प्रचंड परिणाम या मुलांवर होत असतो. 

कारण त्यांना जे जे उत्तम वाटतं, जे जे आदर्श वाटतं (आई-वडील त्यांना त्या काळामध्ये आदर्श वाटत असतात.) त्यांच्या सगळ्या गोष्टी अनुकरण करण्याचा ही मुलं प्रयत्न करत जातात आणि त्यातूनही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही Traits निर्माण होत जातात. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत या दोन मार्गानं मुलं स्वत:चा मेंदू programme करत जातात. आता हे कसं घडतं? याकरता आपण काही गोष्टी समजून घेऊया. थोडी उदाहरणं आपण पाहूया.

खरं म्हणजे दीर्घ काळापासून माणूस अग्नीचा वापर करत आलेला असूनही, अग्नीनं हात भाजतात हे त्याला अजूनही कळालेलं नाही. समजा, हिवाळ्याचे दिवस आहेत. घरामध्ये शेकोटी पेटवलेली आहे आणि पेटवलेल्या या शेकोटीच्या ज्वाळा विझलेल्या आहेत; पण लाल लाल रंगाचे निखारे मात्र अजून शिल्लक आहेत. बाजूलाच एक रांगणारं मूल आहे. त्याला हे लाल लाल रंगाचे निखारे आकर्षून घेतात.

 त्याला वाटतं हे पकडावं, कारण हा लहान मुलांचा स्वभाव आहे. प्रत्येकच लहान मुलाचा स्वभाव असतो, की जे जे समोर दिसेल ते ते हातामध्ये घ्यावं. मग तो चाकू असेल किंवा काहीही असेल, त्याला जरा हाताळून पाहावं म्हणजे स्पर्शज्ञान अनुभवावं. त्याचा वास घेऊन पाहावा. त्याला चाखून पाहावं. 

आपली पाचही इंद्रियं कमी-अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक वस्तूवर operate करून पाहण्याचा प्रयत्न ही मुलं करत असतात. हे मूल आता रांगत रांगत या निखान्यापर्यंत पोहोचणार आणि त्यात हात घालणार हे त्याच्या आईच्या लक्षात आलं. 'मी धावत गेले तरी त्याला निखाऱ्यात हात घालण्यापसून थांबवू शकणार नाही.' हेही तिला कळतंय. म्हणून ती बिचारी जागेवरूनच किंचाळते. "अरे बाळा, निखाऱ्यांना हात नको लावूस रे, तुझे हात भाजतील. " बाळाला 'हात नको लावू' चा अर्थ माहीत नाही. 'हात भाजतील' चा अर्थ माहीत नाही. 

तोपर्यंत त्याने निखान्यामध्ये हात घातलेले आहेत आणि त्यामुळे त्याचे हात पोळताच तो तात्काळ हात मागे घेतो आणि भोकाड पसरून रडायला लागतो. तोपर्यंत आई धावत येते, त्याचे हात पुसते, त्याला मलम वगैरे लावते.

 'अरे बाळा, निखाऱ्यांना हात लावायचा नसतो.' वगैरे बडबड करत राहते; पण यातून त्या मुलाला काही कळत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट कळते; आणि अनुभवातनं खरं तर दोन गोष्टी कळतात, की हे लाल रंगाचे जे निखारे असतात ते, 'आऽ हाऽ! असतात. त्याला हात लावायचा नसतो.' एवढंच नव्हे, तर हे मूल मोठ्या प्रमाणावर पुढे जाऊन जेव्हा जेव्हा कोणी निखाऱ्याजवळ जाईल तेव्हा 'आऽ हाऽ!' असं हात करून सांगत असतं. जणू काही त्याला म्हणायचं असतं, ‘हात नका लावू हं! तुमचेपण हात भाजतील.' हे अनुभवातनं तो शिकतो.

 दुसरा त्याला अतिशय महत्त्वाचा अनुभव येतो तो म्हणजे, आई ज्यावेळेस अचानक ओरडते त्यावेळेस आपण जागच्या जागी थांबलेलं उत्तम असतं. हा बहुधा danger signal असतो आणि यातून हे मूल एक-एक गोष्ट शिकत जातं. या पद्धतीनं एक-एक अनुभव घेत आपण वाढत जातो.

बालसंगोपन कसे करावे ?

बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

 बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?

बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम

बालसंगोपन 6 : तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा

 

OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying