बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम

लहान मुलांना कशा प्रकारे शिक्षा करावी :


 

बालसंगोपनाचे नियम

  • लहान मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही
  • शक्यतोवर मुलांना 'नाही' म्हणायचं नाही
  • एकदा 'नाही' म्हटलंच, तर त्यावर ठाम राहा
  • काहीही झाल तरी लहान मुलांना मारायचं नाही
  • लहान मुलांना कशा प्रकारे शिक्षा करावी 


(अ) लहान मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही

'नालायक मूर्ख कुठला, वात्रट मेला' या पद्धतीची वाक्यं वापरायचीच नाहीत. आजकाल अनेक आई-बाप लहान मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करतात. एक चार-पाच वर्षाचं मूल आहे. त्याचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न वडील करतात कारण आईचा सारखा आग्रह आहे. थकून भागून आलेला हा बाप आहे. तो मुलाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस कदाचित मुलाची शिकण्याची इच्छा नाही. त्याच्या डोक्यामध्ये काही शिरत नाही. 

बापाचा तोल सुटतो आणि शेवटी 'तू बुद्धूच आहेस' असं म्हणून तो मोकळा होतो. जर या मुलाने दोन-चारदा 'मी बुद्ध आहे, बुद्ध आहे' म्हणजे 'तू बुद्धू आहे, तू बुद्धू आहे' असं बापाच्या किंवा आईच्या तोंडून ऐकलं, तर त्याला मनापासून वाटायला लागतं 'मी बुद्धू आहे, बुद्धू आहे, बुद्धू आहे. आणि मग तो दिवसेंदिवस बुद्ध बनत जातो. जोपर्यंत त्याला बुद्धू या शब्दाचा अर्थ माहीत नसतो तोपर्यंत तो कमी बुद्धू असतो. या पद्धतीचे अत्यंत दूरगामी आणि वाईट ..परिणाम असल्या नकारात्मक बोलण्यातून होऊ शकतात. त्यामुळे मुलांसाठी असले नकारात्मक शब्द कधीही वापरायचे नाहीत हे आई-वडिलांनी ठरवलं पाहिजे. 

'नालायक, हलकट, मूर्ख, द्वाड' या पद्धतीनं आपण ज्यावेळेस त्यांना बोलत जातो, त्याच पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्त्व निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. मला माहितेय, की हे परंपरेतून आलेले अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत, कारण आपल्या आई-वडिलांनी आपल्याकरता तेच वापरले. पिढीजात परंपरेने हे शब्द आपण वापरत आलेलो आहोत. त्यामुळं अनेक स्त्रिया मला सांगतात, की “सर, कितीही ठरवलं तरी हे शब्द बाहेर पडतातच." आता या परंपरातगत शब्दांची ओकारी आपल्याला होते हे बरोबर आहे; पण ती मुलांबाबत होऊ द्यायची नाही हे मनापासून ठरवून टाका. 

एखाद्या वेळेस असं जमलंच नाही, तर आपल्या आवडत्या हक्काच्या माणसाकरता ते वापरा. आपल्या नवऱ्याकरता वापरा. त्याला म्हणा 'तू मूर्ख आहेस. तू नालायक आहेस. तू बुद्धू आहेस.' नवरा समजून घेईल, की बायको फार चिडलेली आहे. म्हणून नालायक याचा अर्थ लायक समजायचा, बुद्ध याचा अर्थ बुद्धिमान समजायचा, मूर्ख याचा अर्थ आपण शहाणा काढायचा; आणि या पद्धतीनं स्वतःच्या मनावर परिणाम न होऊ देता तो हे शब्द स्वीकारू शकतो; पण लहान मुलांबाबत मात्र हे घडणं शक्य नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना नकारात्मक शब्द वापरायचे नाहीत.


(ब) शक्यतोवर मुलांना 'नाही' म्हणायचं नाही : 

आपली भाषाच नकारात्मक आहे. लहान मुलाने विचारलं, 'आई, आई जरा मी टी. व्ही. चालू करू का?' 'ए वेडया, टी. व्ही. ला हात नाही लावायचा. बिघडवून ठेवशील.' 'ए वेड्या, फाटकावर चढू नको, पडशील.' 'ये रस्त्यावर जाऊ नको, अपघात होईल.' जणू काही संपूर्ण जगच वाईट आहे आणि सगळं वाईटच घडेल या पद्धतीनं आपण सातत्यानं बोलत जातो. 

सतत 'तो लहान आहे. त्याला हे जमणार नाही.' याची जाणीव करून देण्याचा आपण प्रयत्न करत जातो. ही नकारात्मक भाषा आपण बदलली पाहिजे. काय होतं, ज्यावेळेस आपण लहान मुलाला सांगतो, 'ए, टी. व्ही. ला हात लावायचा नाही. बिघडवून ठेवशील, तेव्हा तो वाट पाहत राहतो की आपली आई केव्हा बाहेर जाते! घरात बापजीही नाही आणि आईजीही नाही. कोणीच नाही म्हटलं की तो टी.व्ही. ची बटणं आडवी तिडवी फिरवतो आणि खरंच बिघडवून ठेवतो.

 त्यापेक्षा जर त्याला नीटपणे टी.व्ही. कसा हाताळायचा, टी.व्ही. च्या कोणत्या भागाला स्पर्श करायचा नाही, हे समजावून सांगितलं तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं त्या टी.व्ही.ची हाताळणी करू शकतो. कितीतरी छोट्या-छोट्या प्रसंगांमधून याला आपण positive tone देऊ शकतो.

समजा, उन्हाळ्याचे दिवस आहेत. घरामध्ये पाहुणे आलेले आहेत. ते सगळं दृश्य पाहिल्यानंतर घरातली लहान मुलं म्हणतात, 'आई, आई, जरा मी ग्लास घेऊन जातो हं!' त्याबरोबर आई खवळते. 'ए मेल्या, हलकटा, काही अक्कल-बिक्कल आहे की नाही तुला. चालला ग्लास घेऊन फोडून ठेवशील. गप्प बस.' असं म्हटल्यानंतर तो बिचारा चेहरा बारीक करून कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. या पद्धतीनं वागवण्याची गरज आहे का? तुम्हाला वेगळी संधी नाही घेता येणार का? त्याच वेळेस जर तुम्ही असं म्हटलं, की 'बाळा रे, मी जरा स्टीलच्या ग्लासमध्ये सरबत भरून तुला देते.

 तू जर हे समोरच्या पाहुण्यांपर्यंत न सांडवता घेऊन गेलास तर तुला काचेच्या ग्लासमध्ये सरबत भरून देईन.' अजून संधी कायम असल्यामुळं मुलांचा हिरमोड होत नाही. उत्साहाने स्टीलच्या ग्लासमध्ये सरबत घेऊन जायला तयार होतात.

 आणि खरोखर जर या मुलांना समोरच्या खोलीपर्यंत, पाहुण्यांपर्यंत जर न सांडवता सरबत नेता आलं, तर ते परत येताना छाती फुगवून एवढ्या अभिमानानं परत येतात, की कोलंबसला अमेरिका सापडल्यानंतर सुद्धा तेवढा अभिमान वाटला नसेल. आणि म्हणतात, 'आई, आई, मी न सांडवता नेलं हं, आता मला काचेचा ग्लास न्यायला दे.' या मुलांना स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये सरबत नेता येतं हे महत्त्वाचं नाही, कारण वाढत्या वयासोबत ते शिकणारच आहेत; पण त्यांना जे जे करावंसं वाटतं, ते ते योग्य वेळी आत्मविश्वासानं आणि यशस्वीपणे करू शकतात हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, मोलाचं आहे. त्यामुळे मुलांना जे जे करावंसं वाटतं, ते ते करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. ते ते करण्यासाठी त्यांना उत्साहित करा. त्यामध्ये जर काही धोके असतील तर ते नीट समजावून सांगा. प्रामुख्यानं आपण मध्यमवर्गीय आई-बाप आपल्या मुलांना धोक्यांपासून दूर ठेवण्याचा प्रचंड प्रयत्न करतो. त्यांच्याकरता एक सुंदर-सुरक्षित जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतो; आणि हा फार धोकादायक आहे. जर आपण सातत्यानं त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना खऱ्या जगाची, वस्तुस्थितीची कल्पना येणार नाही आणि ते पुढच्या जीवनामध्ये टिकू शकणार नाहीत.


आपल्या देशामध्ये एक अतिशय मोठे विचारवंत होऊन गेले. त्याचं नाव 'दादा धर्माधिकारी'. ते नेहमी एक गोष्ट लोकांना सांगायचे. ते म्हणायचे, 'भारतातल्या आया फार महान आया आहेत. (नाहीतरी आपण 'मातृ देवो भव्' असं म्हणतच असतो.) या आया आपल्या मुलांना वाढवताना फार काळजी घेतात. या प्रत्येक आईला असं वाटतं असतं, की शिवाजीसारखे वीर पुरुष या देशामध्ये निर्माण झाले पाहिजेत. शिवाजीसारख्या वीर पुरुषांनी उत्तम तलवार चालवली पाहिजे. आपल्या शत्रूचा निःपात केला पाहिजे. मुस्लिमांना या देशामधून हद्दपार केलं पाहिजे. असं सगळ्यांना वाटत असतं; पण या आईचा आग्रह असतो, की शिवाजी मात्र शेजारच्या घरात जन्माला आला पाहिजे. 

माझ्या घरात मात्र तो येता कामा नये.' म्हणजे माझ्या पोराने तलवार चालवायला घेतली आणि त्याला कुठे जखम-बिखम झाली तर! नको रे बाबा! या पद्धतीचा attitude असतो. हे असं पोरांना वाढवणं. खूप सुरक्षित पद्धतीनं पोरांना वाढवणं अतिशय धोकादायक आहे. पोरांना खरं म्हणजे, थोडी risk घेऊ द्यायला पाहिजे. Calculated risk घेऊ द्यायला पाहिजे. कधी पडझड होऊ द्यायला पाहिजे. त्यांना त्यांच्या पद्धतीने वाढवण्यासाठी मदत केली पाहिजे. त्यांच्या जीवनात काही धोके असतील तर ते नीट समजावून सांगितले पाहिजेत. या धोक्यांपासून स्वतःला वाचवता कसं येतं हे नीट समजावून सांगितलं तरी पुरेसं आहे. या पद्धतीनं मुलांना वाढवण्यासाठी आपण मदत करूया.


(क) एकदा 'नाही' म्हटलंच, तर त्यावर ठाम राहा :


तिसराही मुद्दा आपल्याला अतिशय काटेकोरपणे पाळायचा आहे. कोणत्याही गोष्टीकरता मुलांना 'नाही' म्हणायचं असेल (आणि 'नाही' म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहेच) तर आधी दहादा विचार करा. आपण 'नाही' म्हणतोय त्याला काही अर्थ आहे की नाही हे नीट समजून घ्या; आणि एकदा तुम्हाला वाटलं, की 'नाही' म्हणणं अपरिहार्य आहे तर अतिशय ठामपणे 'नाही' म्हणा. मुलांना नीट समजावून देऊन 'नाही' म्हणा आणि त्यावर मात्र तुम्ही ठाम राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये या 'नाही' चं रूपांतर 'हो' मध्ये होता कामा नये. काय कारण आहे याचं ?


आपण भारतीय आई-बाप अतिशय ढिसाळ आहोत. रस्त्याने आपण चालतो आहोत. मार्केटमधून प्रवास सुरू आहे. आईस्क्रीमचं दुकान दिसलं की मुलं आईस्क्रीम मागतात. आपण नाही म्हणतो. दुसऱ्यांदा नाही म्हटलं, तिसऱ्यांदा नाही म्हटलं, की हेच मूल रस्त्यावर गडबडा लोळायला लागतं. गडबडा लोळायला लागलं की आजूबाजूची लोकं गोळा होतात. त्या माणसांना जर कळलं की मूल आईस्क्रीम मागतं, तर ते आपल्याला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न करतात. 

'अरे क्या बात है साब? बच्चों को तो Ice-cream देनाही पडता है। आजकल बच्चे पैदा किये तो आईस्क्रीम देनाहीच पडता है।' त्यातला एखादा तर एवढा शहाणा असतो, की तो म्हणतो, 'ओ मानवसाहेब, पैसे कमी आहेत काय? देऊ काय आजच्या दिवस उधार! वाटल्यास तुम्ही नंतर परत केले तरी चालतील.' आता या पद्धतीनं जर कोणी बोलायला लागलं, तर आपण खजिल होतो. आपल्या मुलाला Ice-cream देतो.


यातून मात्र या मुलांना, आई-वडिलांना आयुष्यभर कसं Black-mail करायचं त्याचा शोध लागतो आणि मग ही मुलं आयुष्यभर आपल्याला ब्लॅकमेल करत जातात. त्यामुळे 'नाही' म्हटल्यानंतर आपल्याला ठाम राहता आलं पाहिजे. काळ्या दगडावरची ती रेघ असली पाहिजे आणि एरवीसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या मुलांसोबत वागताना जर खूप वेळा 'हो' म्हणत असू आणि काही वेळेस 'नाही' म्हणत असू आणि तेही नीट समजवून देऊन 'नाही' म्हणत असू तर त्यांना 'नाही' स्वीकारणं सोपं जातं, सहज जातं आणि ते 'नाही' स्वीकारायला सुद्धा शिकत जातात.


(ड) काहीही झाल तरी लहान मुलांना मारायचं नाही : 

लहान मुलांना जे काही सांगायचंय ते नीट समजावून सांगा. प्रेमाने समजावून सांगा. त्यांना रागावून सांगायचं नाही. एखाद्या वेळेस तुम्ही आवाज चढवून बोललात तर चालण्यासारखं आहे; पण त्यामध्ये कोणतंही दूषण नको. रागामध्ये आपण जसं बोलतो त्या पद्धतीचा नकारात्मक टोन नको, हे मात्र आपण लक्षात घ्या. आता काय होतं... तुम्ही जर पोरांना न रागावता वाढवायचं ठरवलं, तर तुम्हाला खूप पेशन्स बाळगावे लागतात हे बरोबर आहे; पण हे पेशन्स आपल्याला निर्माण करता आले पाहिजेत.


कोणत्याही परिस्थितीमध्ये लहान मुलांना मारायचंच नाही असं ठरवून टाका. किमान वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापर्यंत मारायचंच नाही. कल्पना करा, की तुमच्या घरामध्ये एक रंगीत नवाकोरा टी.व्ही. आणलेला आहे. अगदी पंधरा-वीस हजार रुपये देऊन तुम्ही तो आणलेला आहे. लहान मुलांना तुम्ही वारंवार तंबी भरलेली आहे की जेणेकरून टी.व्ही. वगैरे फुटेल. आणि समजा पोरं काहीतरी खेळता खेळता एखादा दगड त्याला लागतो आणि टी.व्ही.चा आवाज येतो. तो आवाज ऐकल्याबरोबर, ज्या मुलाच्या हातून तो टी.व्ही. फुटला तो स्वतःच अतिशय nervous होतो.

काही मुलं स्वतः हून रडायला सुरुवात करतात. काही मुलं अत्यंत nervous होऊन, हिरमुसला चेहरा करून एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात. आई आली आहे. तिने पाहिलं, टी.व्ही. फुटला आहे. तिची ताबडतोब काय प्रतिक्रिया असेल? सर्वसामान्य स्त्रीची काय प्रतिक्रिया असेल? हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. सगळ्यात पहिलं, जर तो मुलगा पलंगाखाली जाऊन दडला असेल तर ती आई त्याला ओढून बाहेर काढेल. बदड बदड बदडवून काढेल. एवढंच नव्हे, तर वरून त्याला सांगेल, 'थांब, तुझ्या बाबांना येऊ दे. त्यांना सांगते तू टी.व्ही कसा फोडलास ते.' असं म्हणून त्या बिचाऱ्याला मेल्याहून मेलं करून टाकेल.

खरी प्रतिक्रिया काय असायला हवी आहे? आईच्या लक्षात आलं, की टी.व्ही. फुटलेला आहे, मूल अतिशय हिरमुसलं झालेलं आहे. आईनं ताबडतोब त्या मुलाजवळ जाऊन बसावं. त्याला आपल्या कुशीमध्ये घ्यावं. त्याच्या केसांमधून हात फिरवावा आणि त्याला म्हणावं, 'मला माहितेय, माझ्या बाळाने मुद्दाम टी. व्ही. नाही फोडला. माझ्या बाळाच्या हातून चूक झाली. पुन्हा तू अशी चूक करणार नाही, असं तू ठरवणार आहेस आणि पुन्हा आयुष्यामध्ये अशी चूक करायचीच नाही असं ठरवून आता मात्र तू ती गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करणार आहेस.' असं म्हणून जर आईने त्याला जवळ घेतलं, नीट समजावून सांगितलं, तर या मौल्यवान वस्तूच्या झालेल्या नुकसानीमधून तो अतिशय उत्तम शिकू शकतो. आयुष्यभर पुन्हा असं काही घडणार नाही याची काळजी घेऊ शकतो.

आता ज्यावेळेस मी असं म्हणतो की मुलांना मारायचं नाही, त्यावेळेस आया मनातून फार चिडतात; आणि अनेकदा मुलं व्याख्यानाला आलेली असतात. आई रागावली, चिडली किंवा मारायला लागली की मुलं सांगतात, 'हं! काकांनी सांगितलं नं त्यादिवशी मारायचं नाही, तरी तू मारतेस, चिडतेस, रागावतेस.' त्यावर ह्या आया अत्यंत भडकतात आणि, 'तुझ्या काकांना काय जातं उभं राहून भाषण द्यायला? अरे, माहितेय का पोरांना सांभाळण्यासाठी काय पेशन्स लागतात?' मला नीट कल्पना आहे की स्त्रियांना मुलं सांभाळण्याकरता प्रचंड पेशन्स लागतात. म्हणूनच मला आश्चर्य वाटतं, की एक मूल झाल्यानंतर दुसरं मूलसुद्धा स्वीकारण्याची त्यांची कशी तयारी होते. याचा अर्थ आपल्या स्त्रियांकडे पेशन्सची कमतरता आहे असं मुळीच नाही. आपल्या घरातली मोठी माणसं कशीही वागली तरी आपण आपले पेशन्स कायम ठेवतो. फक्त लहान मुलांच्या ठिकाणी आपण ते सोडतो. असं मात्र होता कामा नये. सगळे पेशन्स लहान मुलांबाबत वापरावेत. काहीही झालं तरी त्यावेळेस शांत राहावं. त्यांना नीट समजावून सांगूनच वागावं.

कदाचित पेशन्स सुटायचीच वेळ आली आणि हे पेशन्स सुटणं जर अपरिहार्य असेल तर आपल्या नवऱ्याबाबत सोडायला हरकत नाही. वाटल्यास आपल्या नवऱ्याला बदड-बदड बदडवून काढावं आणि वरून त्याला सांगावं, 'काय करू? माझा नाईलाज होता.' नवराही म्हणेल, 'ठिक आहे बाबा, Psychological Treatment आहे, थोडी आपली पाठही जरा छान शेकून झाली.' असं म्हणून तो गंमतीनं घेऊ शकेल; पण मुलं मात्र गंमतीनं घेऊ शकत नाहीत. आई-वडिलांनी जर लहान मुलांना मारलं तर त्याचे अत्यंत वाईट दूरगामी परिणाम पुढे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतात. म्हणून आज जगभर सांगितलं जातं, की 'मुलांना शिक्षा द्यायची नाही, रागावयचं नाही आणि मारायचं तर मुळीच नाही.'


(इ) लहान मुलांना कशा प्रकारे शिक्षा करावी :


तुम्हाला जर मुलांना शिक्षा देणं अपरिहार्यच वाटतं असेल तर दोन प्रकारे शिक्षा देता येऊ शकते. थोडक्यात, यामागचा नियम असा आहे, की शिक्षा द्यायचीच झाली तर अशी शिक्षा द्यावी जी शिक्षा परत घेता येते. उदा. समजा, मूल वारंवार समजावून सांगून सुद्धा ऐकत नाही, तर आई त्याला सांगू शकते,

'बाळा, तू माझं ऐकत नाहीस ना, मग मी तुझ्याशी बोलणार नाही. ज्यावेळेस तू ही गोष्ट अमलात आणशील ना, त्याचवेळेस सुरुवात करेन.' सुरुवातीला मूल ‘जा जा, कट्टी फू. नाही बोललं तर माझं काही अडत नाही' असं म्हणेल पण एक-दोन दिवस त्याची आई त्याच्याशी बोलत नाही म्हटल्यानंतर त्याला असह्य होतं. शेवटी तो वाट्टेल तो गोंडा घोळण्याचा प्रयत्न करतो. लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करतो आणि आईला बोलण्यासाठी भाग पाडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होतो. त्यावेळेस आईने फक्त आठवण करून द्यायची. तू हे केलंस की मी बोलणं सुरू करणार आहे. ती गोष्ट करण्यासाठी तो बाध्य आहे.

एखाद्या वेळेस जर ही शिक्षा अपुरी वाटत असेल आणि आणखी शिक्षा वाढवायची असेल तर सांगावं, 'बाळा, तू माझं वारंवार समजावून सांगितलं तरी ऐकत नाहीस. ठिक आहे. तू जोपर्यंत ऐकत नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही.' त्याला उपाशी नाही ठेवायचं. 'मी जेवणार नाही' असं सांगायचं. तो म्हणेल, 'नको जेवू. माझं काय जातं? तू उपाशी राहशील. तुझं पोट दुखेल.' आपली आई जेवते की नाही याकडे तो सारखं लक्ष ठेवून असेल. ती एकदा जेवली नाही, दुसऱ्यांदा जेवली नाही हे लक्षात आल्यानंतर मात्र हे मूल वाट्टेल ती adjustment करायला तयार होईल. कारण आपल्या आईने जेवलं पाहिजे, तिला दुःख होता कामा नये, असं त्याला मनापासून वाटत असतं. याबाबत आईनं एकच काळजी घ्यायची, की मूल आता बाहेर खेळायला गेलं आहे. भूक खूप लागलेली आहे. तेव्हा गुपचूप खाऊन टाकायचं काम करायचं नाही. नाहीतर या सगळ्या शिक्षेचा सारच वाया जाईल. कारण कधी-ना-कधी त्या मुलाला कळेल, की आपल्या आईने आपल्याला फसवलं होतं. हे मात्र घडता कामा नये.

या शिक्षा अपवादात्मक वापरायच्या. नाहीतर दर दिवसातून एकदा 'मी बोलणार नाही' आणि दर आठवड्यातून दोनदा 'मी जेवणार नाही', असल्या शिक्षेचा उपयोग होणार नाही. ह्या अतिशय अपवादात्मक म्हणून शिक्षा वापरायच्या आहेत. हे आपण लक्षात घ्या.

बालसंगोपन कसे करावे ?

बालसंगोपन १: जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी

 बालसंगोपन 2: आपलं व्यक्तिमत्त्व अनुवंशिकतेवर किती प्रमाणात अवलंबून असतं ?

बालसंगोपन 3 : व्यक्तिमत्त्वाचा पाया : पहिल्या पाच वर्षांत

बालसंगोपन 4 : बालपणी केलेल्या संस्कारांचे अनपेक्षित दुष्परिणाम

बालसंगोपन 5: बालसंगोपनाचे नियम

बालसंगोपन 6 : तुमच्या मुलाला उत्तम नागरिक बनवा




OPTOMETRY-SHARP VISION

Optometrist

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying