नेत्रदान पंधरवड्या निमित्त नेत्रदानाविषयी
आज सर्वच ठिकाणी भारतीय पुढे आहेत व काही ठिकाणी पुढे येण्यासाठी प्रयत्न करीत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची तसेच गौरवास्पद बाब आहे पण हीच परिस्थिती नेत्रदानाच्या बाबतीत अगदीच उलट आहे.याबाबतीत श्रीलंका सारखा आपल्या तुलनेने लहान देश आपल्या देशाची तसेच इतरही अनेक देशाची नेत्रदानाची गरज भागवत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकसंख्येने व इतर सेवासुविधांच्या बाबतीत अग्रक्रमाने पुढे येत असलेल्या आपल्या देशात जगातील सर्वाधिक अंध,नेत्रहीनांची संख्या आहे.!भारतात अंदाजे 68 लाख लोक कमीत कमी एका डोळ्यात कॉर्नियल अंधत्वाने ग्रस्त आहेत; यापैकी 10 लाख लोक त्यांच्या दोन्ही डोळ्यांने अंध आहेत त्यातच जागतिक महामारी कोरोना यामुळे कमी झालेले नेत्रदानाचे प्रमाण यामुळे अंधत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी नेत्रदानाचे प्रमाण वाढवणे ही काळाची गरज आहे.
नेत्रदान म्हणजे काय ?
१) नेत्रदान म्हणजे आपल्या मृत्यु पाश्च्यात आपले डोळे अंध व्यक्तीला दृष्टी देण्यास दान करणे.
२) नेत्रदान केलेले डोळे CORNEA TRANSPLANTS साठी वापरण्यात येतात.
३) CORNEA हे डोळ्या सभोवतालचे भिंग असते,नेत्ररोगामुळे अथवा जखम झाल्याने रुग्णास अंधुक दिसू लागते ह्यासाठी नेत्रदान केलेल्या डोळ्यातून ''CORNEA TRANSPLANT'' करून,डॉक्टर दृष्टीहीनास नवीन दृष्टी देतात.आपल्या दोन डोळ्यांचे नेत्रदान हे दोन वेगवेगळ्या CORNEALLAY अंध व्यक्तीस दृष्टी देण्यास कारणीभूत ठरत असल्याने,आपल्या मृत्यु नंतर दोन अंध व्यक्ती जग पाहू शकतात म्हणजे आपल्या एका दानामुळे दोन व्यक्तींचे जीवन प्रकाशमान होते जे आपल्यासाठी भाग्याचे आहे !
नेत्रदानाविषयी थोडेसे…
• आपण आपल्या मृत्युपूर्वी नेत्रदानाची इच्छा ‘नेत्रपेढी’ मार्फत पूर्ण करू शकता. यासाठी आपण नेत्रदानाचा फॉर्म भरलेला नसेल तरीही आपण तशी इच्छा नातेवाईकांजवळ व्यक्त केल्यास ते तुमच्या मृत्यूनंतर तुमचे ‘नेत्रदान’ करू शकतात.
• तसेच एखाद्या व्यक्तिने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी त्याच्या इच्छेचा आदर ठेऊन कार्यवाही करायला हवी. नेत्रदानासाठी नातेवाईकांनी कळविल्यानंतर काही वेळातच तज्ञ डॉक्टर अथवा नेत्रतज्ञ येऊन आपल्या मृतदेहाच्या नेत्रातील ‘पारदर्शक पटल’ (cornea) अथवा संपूर्ण डोळा काढून घेतात. या सर्व प्रक्रियेसाठी फक्त २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो.
• नेत्र निर्हरण केल्यानंतर मृतदेहास विद्रुपता येणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्यात येते. नेत्रदान मृत्यूनंतर ४ ते ६ तासांच्या आताच करावे लागते.
• नेत्रदानास वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचेही बंधन नाही.
• नेत्रदान हे ऐच्छिक असते. त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते.
• नेत्र दात्याचा गंभीर रोगांच्या जंतुसंसर्गामुळे मृत्यू झाला असल्यास, अशा नेत्रांचे रोपण केले जात नाही. अशा नेत्रांचा उपयोग संशोधनासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे हे नेत्र वाया जातात असे नाही.
• अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाही तसेच रॅबिज, सिफील्स, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्स अशासारख्या रोगाने बाधित असणार्याना आपले डोळे दान करता येत नाही.
• जिवंतपणी कोणालाही कायद्यानुसार नेत्रदान करता येत नाही तसेच ज्या व्यक्तीला डोळ्याचे रोपण करण्यात आले आहे त्या व्यक्तीलाही कोणाचे डोळे मिळाले आहेत, हेही सांगितले जात नाही.
• ज्या व्यक्तींच्या डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक पटल (कॉर्निया), खराब झाले आहे; अपघाताने फाटले आहे अथवा (फूल पडल्याने) पांढरे झाले आहे, अश्याच व्यक्तींचे नेत्र रोपण करता येते.
• बाहुलीच्या पडद्याच्या रोपणामध्ये 90 टक्क्याहून जास्त शस्त्रक्रिया यशस्वी होत असून बाहुलीच्या पडद्याच्या समस्येने ग्रस्त असणार्या व्यक्तीना या रोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी मिळते.
• नुकत्याच जन्मलेल्या आणि अस्पष्ट बाहुलीचा पडदा असणार्या बालकांना बाहुलीच्या पडद्याचे रोपण ही एक देणगीच आहे.
• बाहुलीच्या पडदा हा खालील कारणाने अस्पष्ट होतो. 1. संसर्ग 2. इजा 3. डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेणे, 4. कुपोषण आणि 5. अनुवंशिकता.
• नेत्ररोपाणामध्ये डोळ्यातील फक्त सर्वात वरील आवरण (कॉर्निया) म्हणजेच पारदर्शक पटलाचा उपयोग केला जातो. मृत व्यक्तीचा संपूर्ण डोळा कधीही बसवला जात नाही.
• मोतीबिंदू, काचबिंदू, चष्म्याचा मोठा नंबर असल्यास किंवा मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरीही नेत्रदान करता येते..
• नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान मानण्यात आले आहे; नेत्रदान हे मृत्यूनंतर करायचे असल्याने कसलीच भीती नाही.
• तसेच सध्याच्या कोरोनाच्या काळात कोरोनाची तपासणी करूनच नेत्रदान करण्यात येते.
नेत्रदानाविषयी बरेचसे गैरसमज आजही लोकांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात आढळतात.
नेत्रदाना विषयीचे गैरसमज
1. मृत्यु पाश्च्यात नेत्रदान केल्यास पुढच्या जन्मी अंध किंवा अपंग जन्म होतो.
2. नेत्रदान करण्यासाठी हॉस्पीटलला मृत व्यक्तीची बॉडी न्यावी लागत असल्याने,एकंदर प्रकरीयेस खूप उशीर होतो.
3. नेत्ररोपण केल्यानंतर मृत्यूपूर्वी नेत्र दात्याने पाहिलेली कुठलीही गोष्ट नेत्र प्राप्त झालेल्या व्यक्तीस दिसत नाही.
4. मृत्यूपश्चात नेत्रदान करणाऱ्यास शुल्क आकारले जाते.
6. ज्या व्यक्तींच्या डोळ्यातील सर्वात बाहेरील पारदर्शक पटल (कॉर्निया), खराब झाले आहे; अपघाताने फाटले आहे अथवा (फूल पडल्याने) पांढरे झाले आहे, अश्याच व्यक्तींचे नेत्र रोपण करता येते.
नेत्रदान कोण करू शकतो ?
१) डोळ्याचे OPEARATION झालेल्या व्यक्ती.
२) आपणास कमी दिसत असेल तरी.
३) आपण चष्मा वापरत असाल तरीही.
४) डायबेटिक (मधुमेह )रुग्ण असाल तरीही,
५) हायपर टेंशन (HYPER TENSION)चे रुग्ण असाल तरीही,
६) मानसिक त्रास असणारी व्यक्तीही असाल तरीही
७) नेत्रदानाला वयोमर्यादा नाही.आपण कितीही वय वर्षाचे असाल तरीही नेत्रदान करू शकता !!!
''नेत्रदानाची वस्तुस्थिती'':-
१) नेत्रदान हे मरणोत्तर करता येते.
२) मृत्यु नंतर 4 ते 6 तासात नेत्रदात्याचे डोळे काढले गेले पाहिजेत.
३) फक्त रजिस्टर डॉक्टरच नेत्रदात्याचे नेत्र मृत्यु पश्च्यात काढतील.
४) नेत्रपेढीची टीम नेत्रादात्याचे डोळे घरी येऊन अथवा हॉस्पिटल मध्ये काढून घेऊ शकतील.
५) नेत्रदात्याचे डोळे ( नेत्र ) काढण्याच्या प्रक्रियेला फक्त 20 ते 30 मिनिटाचा अवधी लागत असल्याने,अन्त्य संस्कारासाठी तेवढाच उशीर होऊ शकेल.
६) संसर्गजन्य रोग आहेत कि नाही हे तपासण्यासाठी नेत्रदात्याच्या शरीरातून थोडे रक्त घेतले जाते.
७) डोळे काढल्याने मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप होत नाही .
८) कुठलाही धर्म तसेच धर्मग्रंथ नेत्रदानाला नकारात नाही .
९) नेत्रदात्याची तसेच नेत्र प्राप्ती रुग्णाची ओळख गुप्त ठेवण्यात येते.
नेत्रदानासाठी काय करावे यासाठी नातेवाईकांना सुचना.
1. मृत्यूपश्चात नेत्रदानाची इच्छा असल्यास नेत्रदानाचा फॉर्म भरून द्या. फॉर्म भरला नसला तरीही नातेवाईकांकडे आपली नेत्रदानाची इच्छा व्यक्त करा. आपल्या मृत्युनंतर ते आपली इच्छा पूर्ण करू शकतात.
2. नेत्रदानासाठी इच्छित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्वरित नेत्रपेढीस कळवा.
3. नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅकेत जमा होतील, असे पहावे.
4. नेत्रदानासाठी फोन केल्यावर आपला संपूर्ण पत्ता, फोन नंबर, मृत्यूची वेळ इ. कळवावे.
5. मृत व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, किंवा मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा.
6. पंखा चालू असल्यास तो बंद करावा तसेच व एअर कंडिशनर बंद ठेवावा.
7. शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.
8. मृत पावलेल्या व्यक्तीचे डोके अंदाजे 6 इंच वर उचलून ठेवावे किंवा मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवावी असे केल्याने डोळे काढताना रक्तस्त्राव टाळता येईल.
9. जवळच्या नेत्रपेढीस अथवा 1919 ला फोन करावा.
10. डॉक्टर कडील मिळालेला मृत्यूचा दाखला तयार ठेवावा.
11. नेत्रदात्याचे नेत्रदान हे त्याच्या मृत्यु पाश्च्यात त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या तसेच दोन साक्षीदारांच्या सहिनेच करता येत असल्याने,त्यासाठी नातेवाईकांचे सहकार्य आवश्यक आहे.
12 डॉक्टरांकडून घेतलेल्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची एक झेरॉक्स प्रत व नेत्रदानाचे संमतीपत्र नातेवाईकांनी नेत्रपिढीला भरून देणे आवश्यक आहे.
नेत्रदान करावयाची इच्छा असल्यास:-
• नेत्रदानासंबंधी पूर्ण माहिती करून घ्या आणि नेत्रदानाचा संकल्प करा.
• नेत्रपेढीत संपर्क साधून नेत्रदानाचा अर्ज भरावा.
• नेत्रदानाच्या इच्छेसाठी फॉर्म सर्व नेत्रपेढ्यांमध्ये सदैव उपलब्ध असतात.
• आपल्या कुटुंबियांना आपल्या मरणोत्तर नेत्रदानाच्या इच्छेबद्दल सांगून ठेवावे.
• आपला मित्रपरिवार व नातेवाईक यांनासुद्धा या कार्यात सामावून घ्या. त्यांनाही नेत्रदानाची महती पटवून द्या.
• नेत्रदान’ ही आपल्या समाजाची व कुटुंबाची एक श्रेष्ठ परंपरा म्हणून निर्माण करूयात
ज्याप्रमाणे प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना 'भावी काळात दूरदृष्टी ठेवून भावी जीवनात कोण व्हायचे आहे, हे ठरवून वाटचाल कर' व एक आदर्श व्यक्ती बन, असे सतत खुणावत असतात.तसे करत असतांना त्यांनी स्वताही पुढाकार घेत नेत्रदानाचा फॉर्म भरावा व मुलांसमोर एक नवा आदर्श उभा करावा.आजच्या युगात दानाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे. धनदान, अन्नदान ही दान पण महत्वाची आहेत पण ही क्षणीक आहेत. यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली, तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल.व त्यांमुळे तो त्याच कुटुंबही निटपणे सांभाळत त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल.त्यामूळे ही मदत काही एका व्यक्तिपूर्ती न रहाता एका कुटुंबापूर्ती न रहाता सर्वांसाठी असेल..त्यामूळे सर्वानी नेत्रदान करावे व आपल्या आप्तस्वकियांनाही सांगावे व ख-या अर्थाने मनुष्य जन्म सार्थक करुन पुण्य साधावे.
शेवटी एवढंच की नेत्रदान जनजागृती ही काही ठराविक दिवसांपूर्ती न राहता ती नेहमीसाठी आपल्या कार्याचा व परंपरेचा भाग म्हणून राहावी त्यासाठी सदैव तत्पर व जागरूक राहावे.
Tags:
eyedonation