रातांधळेपणा म्हणजे काय ?

रातांधळेपणा म्हणजे काय ?

Night blindness


रात्रीच्या अंधारात कोणालाच नीट दिसत नाही. उजेडातून अंधारात गेल्यानंतर आपल्याला काही काळ काहीच दिसत नाही. त्यामुळेच सिनेमाला उशीरा येणारे लोक जेव्हा थिएटरमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ते अक्षरश: आंधळ्यासारखे, चाचपडत चालत असतात. थिएटरमध्ये आधीपासून बसलेल्या लोकांना मात्र त्याची गंमत वाटते, कारण त्यांना व्यवस्थित दिसायला लागलेले असते. डोळ्याच्या अंतर्भागात रेटीना किंवा दृष्टिपटल असते. त्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात. या पेशींना 'कोन व रॉड' असे म्हणतात. त्यापैकी कोन हे उजेडातील दृष्टीसाठी तसेच वस्तूचा आकार, रंग याचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असतात. रॉड हे अंधारातील दृष्टीसाठी आवश्यक असतात. रॉडमध्ये होडोप्सीन नावाचे रंगद्रव्य असते. याची निर्मिती जीवनसत्त्व 'अ' पासून होत असते. उजेडात होडोप्सीनचे रूपांतर जीवनसत्त्व 'अ' मध्ये, तर अंधारात जीवनसत्त्व 'अ' चे रूपांतर होडोप्सीनमध्ये होते. अंधारात दिसण्यासाठी होडोप्सीन निर्माण होणे महत्त्वाचे आहे. उजेडातून अंधारात आल्यावर हळूहळू होडाप्सीनची निर्मिती होते व आपल्याला दिसायला लागते. याला अंधाराला आपण सरावणे असे म्हणता येईल.


जीवनसत्त्व 'अ'च्या अभावामुळे होडोस्पीनची निर्मिती कमी प्रमाणात होते व साहजिकच अंधारातील दृष्टीवर विपरीत परिणाम होतो. जीवनसत्त्व 'अ' चा अभाव विशेषेकरून सहा वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. अशी मुले सायंकाळी चाचपडत चालतात. आवाजाचा कानोसा घेऊन चालायचा प्रयत्न करतात व वस्तूंना अडखळून पडतात. यालाच 'रातांधळेपणा' असे म्हणतात.


रातांधळेपणा येणे ही जीवनसत्त्व 'अ' च्या अभावामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची फक्त सुरुवात असते. जीवनसत्त्व ‘अ’ चा पुरवठा न झाल्यास डोळ्यातील आवरण कोरडे पडून त्यावर व्रण पडतो. शेवटी डोळ्यात फूल वा टीक पडू शकते. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आजारात डोळा पूर्णपणे खराब होऊन अंधत्व येते. आपल्याला नवल वाटते, पण आपल्या देशातील एकूण अंधांपैकी २ टक्के अंध जीवनसत्त्व 'अ' च्या अभावामुळे अंध होतात. हे टाळण्यासाठी सोपा उपाय म्हणजे जीवनसत्त्व 'अ' असलेला आहार घेणे. ज्यात शार्क व कॉर्ड माशांच्या यकृताचे तेल, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पाने, हिरव्या पालेभाज्या, पपई, आंबे इ. पदार्थांचा समावेश होतो. असे पदार्थ खाल्ल्याने जीवनसत्त्व 'अ' चा अभाव निर्माण होणार नाही व पर्यायाने रातांधळेपणा, तसेच अंधत्वही टाळता येईल.

Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying