१८ मार्च जागतिक चष्मा दिवस
दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे 'चष्मा' एक साधन.
वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्यासमोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात.
चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.
इतिहास :
काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ.स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत.
१२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो.
पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली.
चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला.
प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.
दृष्टिदोष :
विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.
गोलीय भिंगे :
नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात.
एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.
चित्याकृती भिंगे :
दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.
लोलक बहुकोनी भिंगे :
कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.
द्विकेंद्री भिंगे :
लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.
त्रिकेंद्री भिंगे :
यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.
विशेष प्रकार :
उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.
प्रायोगिक अवस्थेतील चष्मे :
१) अंधांसाठी चष्मा:
विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.
२) अंतरानुसार बदलणारा चष्मा:
द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.
भारतीय उद्योग :
भारतात १९६६ पर्यंत चष्म्याच्या सर्व प्रकारच्या मजबूत, टिकाऊ आणि दिखाऊ चौकटी आयात कराव्या लागत होत्या. पण १९६६ पासून भारतात या विविध प्रकारच्या चौकटी तयार होऊ लागल्या असून परदेशातही निर्यात होऊ लागल्या आहेत.
शंभराहून अधिक लघुउद्योग केंद्रांत चष्म्याच्या प्लॅस्टिकच्या चौकटी तयार होत आहेत. काही मोठ्या कारखान्यांत विविध प्रकारच्या ठेवणीच्या, आकर्षक, परदेशातील चोखंदळ लोकांनाही पसंत पडतील अशा चष्म्याच्या चौकटी तयार करण्यात येत आहेत.
परदेशात आधुनिक, लोकप्रिय असलेल्या चौकटीकडे लक्ष ठेवून तशा प्रकारचे उत्पादन करण्याकडे भारतीय कारखानदारांनी यश मिळविले आहे. यामुळे इंग्लंड, पश्चिम जर्मनी, रशिया, स्वित्झर्लंड आणि इतर यूरोपीय देश, तसेच दक्षिण व पूर्व आफ्रिका या देशांत हा माल निर्यात होत आहे