उन्हाळ्यात डोळ्याची काळजी कशी घ्यावी ?
उन्हाळ्यामुळे डोळ्यांना अजून काही दिवस त्रास जाणवण्याची शक्यता आहे. म्हणून डोळे सांभाळायला हवेत.
उन्हाच्या तापाशी आपल्या स्वास्थ्याचा ताळमेळ जुळविताना सगळ्यांनाच बरीच कसरत करावी लागते आहे. त्यातही रोजच्या जीवनात सर्वाधिक कार्यरत असणारे, वापरले जाणारे आपले महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले डोळे. त्यांना उन्हाची झळ बसू नये, त्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. डोळ्यांची जळजळ होणे, अधूनमधून डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, दुखणे या तक्रारींचे प्रमाण एकंदरीतच वाढलेले दिसून येत आहे.
अलीकडे या लक्षणांची तीव्रता अधिक दिसणे, डोळ्यांना जंतुसंसर्ग होणे, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अशी लक्षणे निर्माण झाल्यावर वेळेवर नेत्रतज्ज्ञांना दाखवून योग्य ते औषधोपचार करायला हवेत, हे तर योग्यच; पण त्याबरोबरच या तक्रारी निर्माण होऊ नयेत म्हणून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, लक्षणे निर्माण होत असल्याचे जाणवताच अथवा झाल्यावर कोणते घरगुती उपाय करावेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याचीही माहिती करून घ्यायला हवी. यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यावर दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
डोळ्याच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. डोळ्यांना सूज येणे, चिकट स्राव येणे, अशी जंतुसंसर्गाची लक्षणे दिसत असल्यास नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषधांच्या दुकानातून कोणतेही आय ड्रॉप्स विकत घेऊन डोळ्यांत घालू नयेत.
डोळ्यांची आग होणे, कोरडेपणा जाणवणे, किंचित लाली असणे, अशा तक्रारींसाठी ल्युब्रिकंट ड्रॉप्स, डोळ्यांना थंडावा देणारे आय ड्रॉप्स घालायला हरकत नाही. परंतु अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड अशा प्रकारचे घटक असणारे ड्रॉप्स डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही डोळ्यांत घालू नयेत, कारण काही वेळा त्यामुळे उपाय होण्याऐवजी अपाय होणे अधिक संभवते.
किरकोळ स्वरूपाच्या तक्रारींसाठी पुढील उपाय घरच्या घरी करता येतील.
१) साध्या नळाच्या पाण्याने दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ धुवावेत.
२) घराबाहेर जाताना गॉगल, टोपी, छत्री या संरक्षक गोष्टींचा अवश्य वापर करावा.
पोलराईज्ड प्रकारच्या काचा उन्हाच्या झळांपासून डोळ्यांचे रक्षण करतात.
३) रात्री झोपताना तसेच इतर वेळी शक्य होईल तेव्हा बंद डोळ्यांवर थंड दूध, गुलाबपाणी यात भिजवलेल्या पट्ट्या अथवा काकडी, कोरफडीच्या गराचे तुकडे पाच-दहा मिनिटांसाठी ठेवावेत. ॲलोव्हेरा जेल, युडी कोलन आय पॅड्सचा वापरही करता येऊ शकतो.
४) डोळ्यांचा मेकअप, कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असल्यास डोळ्यांच्या स्वच्छतेकडे अधिक जागरूकतेने लक्ष देणे आवश्यक आहे. काही वेळा मेकअपमधील रसायने, तसेच लेन्सेसमुळे डोळ्यांना जंतुसंसर्ग, ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. या दिवसांमध्ये निसर्गतःच डोळ्यांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार डोळ्यांना उष्णता जाणवते, डोळ्यांना खाज सुटणे, असे लक्षण दिसून येते.
याशिवाय हवेतील धूर, धूळ यांचे प्रदूषण, सतत बदलती ताणपूर्ण अनियमित जीवनशैली, या सर्व गोष्टींचा परिणाम केवळ आपल्या डोळ्यांच्या स्वास्थ्यावर नव्हे, तर संपूर्ण शरीर स्वास्थ्यावर होत आहे. त्यामुळे नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होणे, स्वास्थ्य संतुलन बिघडणे या गोष्टी घडणे स्वाभाविक आहे. स्वास्थ्य संकल्पनेचा विचार आयुर्वेदाने अधिक व्यापक स्वरूपात मांडलेला आहे. दैनंदिन जीवनाबरोबरच प्रत्येक ऋतूत आहार कोणता घ्यावा, कोणते अन्नपदार्थ टाळावेत, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, काय टाळावे, याचे सविस्तर वर्णन दिनचर्या, ऋतुचर्चा या अंतर्गत आयुर्वेदीय ग्रंथात केलेले आहे.
आपल्या काही रुढी, सण-परंपरांमध्येही त्याचे प्रतिबिंब दिसून येते. उदा. गुढीपाडव्याला कडुनिंब पानांचा, गाठींचा आहारात सेवन, वाळा घातलेल्या माठातील पाणी, कैरी पन्हे, चिंचवणी आदी पदार्थांचा आहारातील समावेश हा या ऋतूतील वाढणाऱ्या उष्णतेचे नियमन करणारा आहे. मानवी शरीर व सृष्टी (निसर्ग) यामधील अन्योन्य संबंध, दोन्हींमध्ये समान असणारी पंचमहाभूतात्मक तत्त्वे यांना आधार मानून आयुर्वेदात स्वास्थ्य संकल्पना रोगांची निर्मिती, त्यावरील उपचार याबाबत मार्गदर्शन केलेले आहे.
डोळ्यांबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करता, सृष्टीतील अग्नी-सूर्य तत्त्वाचा प्रतिनिधी म्हणजे आपल्या शरीरातील चक्षुरेंद्रिय - आपले डोळे हे आहेत. त्यामुळे सृष्टीत हे तत्त्व बलवान असताना शरीरातील अग्नी महाभूतप्रधान डोळ्यांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे.
त्याचबरोबर आजच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणाऱ्या मोबाईल-टॅब-लॅपटॉपच्या जमान्यात आपण आपले डोळे अतिप्रमाणात, तसेच बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने वापरत असतो. या सर्व जादुई यंत्राशिवाय दैनंदिन कामे करणे जवळपास अशक्य आहे, हे जरी खरे असले, तरी ही यंत्रे ज्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण वापरू शकत आहोत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हे नक्कीच हितकर नाही.
एक वेळ ही सर्व यंत्रे आपण ‘अपडेट’ करू शकतो, बदलू शकतो, पण डोळे बदलून मिळण्याचे तंत्रज्ञान अजून तरी उपलब्ध झालेले नाही, हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे या यंत्रांचा दैनंदिन वापर करताना काही गोष्टींची सवय लावून घेणे आवश्यक आहे. ही साधने वापरत असताना
१) विशिष्ट कालावधीनंतर (साधारणतः दोन तासांनंतर काही मिनिटे या साधनांपासून दूर जावे, बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारावेत, शक्य तेवढे दूरच्या अंतरावरील दृश्य पाहण्याचा प्रयत्न करावा. (नैसर्गिक रंग - झाडे, आकाश इ.),
२) ट्वेंटी-ट्वेंटी नियमाचा वापर करा. म्हणजे दर वीस मिनिटांनी, वीस सेकंदांसाठी, वीस फुटांपेक्षा लांबवरची वस्तू पाहणे.
३) अधूनमधून डोळे बंद करून हातांनी हलकेच झाकावेत, दीर्घ श्वसन करावे.
४) नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, गरजेप्रमाणे लुब्रिकंट आयड्रॉप्सचा वापर करावा.
आयुर्वेद मते, आपल्या डोळ्यांप्रमाणेच तळपाय हेसुद्धा अग्नीचे स्थान आहेत, म्हणूनच या दिवसात, शक्य होईल तेव्हा अनवाणी हिरवळीवर चालावे. (दूर्वा असल्यास अधिक उत्तम), तळपायांना रात्री गाईचे तूप अथवा खोबरेल तेलाने हलका मसाज करावा.
पावले थंड पाण्यात बुडवून काही वेळ बसावे. पादत्राणे वापरताना प्लॅस्टिक तसेच उष्णता शोषणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या बूट, चपला यांचा वापर टाळावा. या सोप्या उपायांमुळे शरीरातील व पर्यायाने डोळ्यांतील उष्णता कमी होण्यास चांगला उपयोग होतो.
डोळ्यांमध्ये सतत वाढत जाणारी उष्णता ही नेत्ररोगांना आमंत्रण देणारी ठरू शकते, म्हणून याकडे विशेष लक्ष द्यावे. याबरोबरच आहारात गरम मसाला, अति आंबवलेले पदार्थ (इडली, उत्तप्पा, आंबोळी, बेकरी प्रॉडक्टस), अति खारवलेले (लोणची, पापड, चिप्स इ.) पदार्थ यांचा सतत आणि वारंवार वापर टाळावा. त्याऐवजी ताजे लोणी, गाईचे तूप, दूध, तुळशी, सब्जा-बी, डोंगरी आवळा, गुलकंद, धने-जिरे, सैंधव, कोथिंबीर, पुदिना यांचा आवर्जून समावेश करावा.