“जागरूक पालक, सुदृढ बालक” अभियान
महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामीण, शहरी व मनपा विभागातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, प्रयोगशाळा तपासण्या व आवश्यकतेनुसार उपचार तथा शस्त्रक्रिया करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत “जागरूक पालक, सुदृढ बालक” अभियान राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे. या अभियानाची सुरुवात आज दिनांक 09/02/2023 पासून सुरू होत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
त्याअंतर्गत, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, आश्रमशाळा, अंध- दिव्यांग शाळा, अंगणवाडया, बालगृहे / बालसुधार गृहे, अनाथालये, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली), खाजगी नर्सरी, बालवाडया, खाजगी शाळा व खाजगी कनिष्ठ महाविद्यालये तसेच शाळा बाहय ० ते १८ वर्षापर्यंतच्या मुला-मुलींची आरोग्य तपासणी करावायची आहे. तपासणी दरम्यान आजारी आढळून आलेल्या बालकांवर त्वरित उपचार व संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहे.
मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सुचनेनुसार, राज्यातील० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकेतसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग, नगर विकास विभाग, पंचायत राज विभाग, व समाजकल्याण विभाग यांच्या समन्वयाने अभियान राज्यभर राबविण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. त्यानुसार सदर उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबवावयाचा आहे. त्याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सुचना खालीलप्रमाणे देण्यात येत आहेत.
उद्दिष्ट :
१. ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे.
२. आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरित उपचार करणे
३. गरजू आजारी बालकांना संदर्भ सेवा देऊन उपचार करणे. (उदा. औषधोपचार, शस्त्रक्रिया, ई.)
४. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे.
५. सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करणे.
लाभार्थी उद्दीष्ट
राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील एकूण लाभार्थी अंदाजित २.९२ कोटी आहेत. त्यांचे ग्रामीण, नगरपालिका (शहरी) व महानगरपालिका याप्रमाणे विभाजन करण्यात आले आहे.