दिव्यांग व्यक्तींना परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी रायटर (लेखनिक ) मिळण्याबाबतचा शासन निर्णय

Form for disabled persons to get writer in examination.

दिव्यांग व्यक्तींना परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी रायटर (लेखनिक ) मिळण्याबाबतचा शासन निर्णय.

Regarding getting writers to write in examinations for persons with disabilities.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार दिव्यांग व्यक्तींना शालेय, महाविद्यालयीन, पूर्व प्रवेश परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षेसाठी लेखनिक उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तथापि अशा सूचना संबंधीत प्राधिकाऱ्यांना वेळोवेळी देऊनही दिव्यांग व्यक्तींना लेखनिक उपलब्ध करुन देताना समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या दि. २९.०८.२०१८ च्या कार्यालयीन आदेशांच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागातील दि. १८.०३.२०१४ च्या परिपत्रकामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळोवेळी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने विचार करुन उपरोक्त दि. १८.०३.२०१४ चे परिपत्रक अधिक्रमित करुन नव्याने सुधारीत परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

खालील प्रमाणे शासन निर्णय

केंद्र शासनाने दि.२९.०८.२०१८ नुसार लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची सुधारित मार्गदर्शिका निर्गमित केली आहे. त्याच धर्तीवर, केंद्र शासनाची मार्गदर्शिका स्विकृत करुन महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा व इतर सर्व तत्सम स्पर्धा परीक्षा यांचेकरिता लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका खालीलप्रमाणे सुचित करण्यात येत आहे.

१. सदर मार्गदर्शिकेस "लक्षणीय (Benchmark ) दिव्यांग व्यक्तींच्याबाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका, २०२१” असे संबोधण्यात यावे.

२. तंत्रज्ञानामध्ये झालेली सुधारणा लक्षात घेऊन लक्षणीय (Benchmark ) दिव्यांग व्यक्तींकरिता नवीन मार्ग खुले असल्याचे विचारात घेता, लक्षणीय (Benchmark ) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना इतरांसोबत समान स्तरावर लेखी परीक्षा देण्याबाबतची संपूर्ण देशभरात एकसारखी व व्यापक मार्गदर्शिका असण्याबाबतचे धोरण असणे आवश्यक आहे. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तीनुरुप विशिष्ट गरजांचा समावेश करण्याच्या दृष्टीने धोरणामध्ये लवचिकता असण्याची आवश्यकता आहे.

३. नियमित लेखी परीक्षा व स्पर्धा परीक्षा यांच्याकरिता स्वतंत्र निकष असण्याची गरज नाही.

४. लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थी यांना स्पर्धा परीक्षेस बसताना लेखनाची अडचण तसेच लेखनाची गती कमी असल्यास त्यांनी केलेल्या मागणीनुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (आर) नुसार लक्षणीय (Benchmark) दिव्यांग व्यक्तींच्या वर्गवारीमधील अंधत्व / शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित / नसलेले)/ मेंदूचा पक्षाघात असलेल्या दिव्यांग परिक्षार्थीना लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे.

लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या इतर प्रकारांतील दिव्यांग परिक्षार्थीच्या बाबतीत, संबंधित दिव्यांग व्यक्तीने लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक पुरविणे आवश्यक असल्याचे शासकीय रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक/ वैद्यकीय अधिक्षक यांनी प्रमाणित केलेले विहित नमुन्यातील (Appendix - 1) प्रमाणपत्र सादर केल्यानंतर सदर दिव्यांग परिक्षार्थीस गरज व आवश्यकतेनुसार परीक्षा देताना लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक नियुक्त करण्यास परवानगी देण्यात यावी.

५. परीक्षा देणारा लक्षणीय (Benchmark ) दिव्यांगत्व असलेला परिक्षार्थी आपल्या सद्सद्विवेक बुध्दीने लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची निवड करेल अथवा परीक्षा मंडळाकडे याबाबतची विनंती करेल. परीक्षेच्या आवश्यकतेनुसार परीक्षा मंडळ जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर व राज्य स्तरावर लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची यादी तयार ठेवतील. अशा उदाहरणांत, लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवारास परीक्षा मंडळातर्फे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांस परीक्षेपूर्वी दोन दिवस अगोदर भेटून सदर लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक स्वत:साठी सुयोग्य आहेत याबाबतची पडताळणी करण्याची संधी देण्यात यावी.

६. परीक्षा मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असल्याबाबतची तसेच सदर लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता इ. १० वी किंवा त्यापेक्षा जास्त असल्याबाबतची खात्री करावी.

सबंधित लक्षणीय (Benchmark ) दिव्यांगत्व परिक्षार्थी उमेदवारास स्वतः लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक याची व्यवस्था करण्यास मान्यता दिली असल्यास अशा परिस्थितीमध्ये लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी. लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवाराने विहित नमुन्यात (Appendix - II) लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची माहिती परीक्षा मंडळाकडे द्यावी.

७. लेखनिकाची मदत घेणाऱ्या उमेदवारांकरीता विशेष सूचना:-

७.१ दिव्यांग उमेदवार प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाचण्यास आणि/अथवा उत्तरे लिहीण्यास सक्षम नसल्याच्या कारणास्तव त्यास लेखनिकाची मदत अनुज्ञेय आहे. यास्तव, लेखनिकाने दिव्यांग उमेदवारास केवळ प्रश्न वाचण्यास तसेच उमेदवाराने उत्तर छायांकित करण्यास / लिहीण्यास मदत करणे अपेक्षित आहे.

७.२ लेखनिकाने प्रश्न वाचून दाखवल्यानंतर उमेदवाराने सांगितलेले उत्तरच विहीत ठिकाणी छायांकित करणे/ लिहीणे अपेक्षित आहे. उत्तराच्या निवडीबाबत लेखनिकाने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप / मार्गदर्शन / सूचना करू नये. तसेच परीक्षा मंडळाने प्रत्येकी ५ उमेदवारांकरीता (लेखनिकासह) एक समवेक्षक या प्रमाणात समवेक्षकाची नेमणुक करुन उमेदवाराने सांगितलेले उत्तरच लेखनिकाने विहीत ठिकाणी छायांकित/लिहिलेले आहे याची खातरजमा करावी.

७.३ लेखनिकाने परीक्षा कालावधीत प्रश्नोत्तराबाबत अथवा इतर कोणत्याही विषयी उमेदवारांशी चर्चा / गप्पा करु नयेत. तसेच इतर लेखनिक / उमेदवार यांच्याशी बोलू नये. 

७.४ दिव्यांग उमेदवार व लेखनिक यांना परीक्षांचे सर्व नियम / सूचना जशाच्या तसे लागू असतील.

७.५ उमेदवाराने स्वतः व्यवस्था केलेल्या लेखनिकाच्या गैरवर्तनाची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील. तसचे लेखनिक व उमेदवार यांच्यामधील संभाषणामुळे परीक्षेची शांतता कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही अथवा इतर उमेदवारांची एकाग्रता भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.

८. आपत्कालीन परिस्थितीमध्ये परीक्षा सुरु होण्याच्या ऐनवेळी लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या बदलणेबाबत लवचिकता असावी. वेगवेगळ्या विषयाच्या पेपरसाठी मुख्यत्वेकरुन भाषाविषयक पेपरसाठी वेगवेगळे लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक नियुक्त करण्याची संबंधित लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व परिक्षार्थी उमेदवारास परवानगी राहील. तथापि एका विषयाकरिता एकच लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक वापरता येईल.

९. परीक्षेचे माध्यम (उदा. सर्वसाधारण / ब्रेल लिपी / संगणकाद्वारे / ध्वनीमुद्रण / ठळक व मोठ्या अक्षरातील प्रती) स्विकारण्याचा पर्याय संबंधित लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व परिक्षार्थी उमेदवारास उपलब्ध करावा जेणेकरुन परीक्षा मंडळास सुलभरित्या तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा पेपरचे रुपांतर मोठ्या व ठळक अक्षरातील प्रतीमध्ये / ई-टेस्ट / ब्रेल लिपी / ब्रेल मजकुराचे रुपांतर इंग्रजी व प्रादेशिक भाषांमध्ये करणे सोईचे होईल.

१०. संबंधित लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व परिक्षार्थी उमेदवारास संगणकीय प्रणालीद्वारे परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली असल्यास अशा परिस्थितीत संबंधित लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व परिक्षार्थी उमेदवारास परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित संगणकीय प्रणालीची पाहणी व तपासणी करण्याची परवानगी देण्यात यावी. जेणे करुन त्याला जर संगणक प्रणाली हाताळणी करण्यामध्ये काही समस्या असतील तर त्याचे निराकरण त्यास करता येईल. परंतू स्वत:चा संगणक लॅपटॉप परीक्षेस वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तरीदेखील लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींकरिता दिव्यांग स्नेही व वैशिष्टयपूर्णरित्या बनविण्यात आलेले की-बोर्ड, माऊस अशी उपकरणे वापरण्यास परवानगी राहील.

११. लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक पुरविण्याची प्रक्रिया सुलभ असावी तसेच सदर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या माहितीची नोंद परीक्षेचा अर्ज भरण्याच्या वेळी घेण्यात यावी. परीक्षा मंडळाने लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीने मागणी केल्यानुसार परीक्षेचे माध्यम तसेच दिव्यांग व्यक्तीसाठी सुयोग्य अशी बैठक व्यवस्था पुरविलेबाबत खात्री करावी. 

१२. कोणत्याही ठिकाणच्या सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राचा स्विकार देशभरात करण्यात यावा. 

१३. लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या जादा वेळेबाबत सद्यस्थितीत प्रचलित असलेला “शब्द, “परीक्षेकरिता जादा वेळ / अतिरिक्त वेळ" याऐवजी "भरपाई वेळ" असा बदलण्यात यावा. तसेच लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक वापरण्यास परवानगी देण्यात आलेल्या लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारा सदरचा भरपाई वेळ हा प्रति तास वीस मिनिटे यापेक्षा कमी नसावा. लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या सर्व परिक्षार्थीना लेखनिक / वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नसली तरी अशा परीक्षार्थीना भरपाई वेळ हा तीन तासामागे एक तास अधिक याप्रमाणे देण्यात यावा. जर परीक्षेचा वेळ एक तासापेक्षा कमी असल्यास भरपाई वेळ हा त्या प्रमाणात (pro-rata basis) देण्यात यावा. तथापि सदर वेळ हा पाच मिनिटांपेक्षा कमी नसावा व पाच मिनिटांच्या पटीत सदर वेळ देण्यात यावा.

१४. लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थी उमेदवारास परीक्षेसाठी आवश्यक असणारी सहाय्यक उपकरणे जसे बोलणारा कॅलक्युलेटर (ज्या परीक्षापध्दतीत कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी आहे अशा बाबतीत), टेलर फ्रेम, अॅबॅकस, ब्रेल पाटी, भूमितीय कीट, ब्रेल मोजमाप पट्टी, सुसंवादवर्धक उपकरणे जसे की कम्युनिकेशन चार्ट, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इ. आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी असावी.

१५. परीक्षेच्या वेळी होणारा उमेदवाराचा संभ्रम व गोंधळ टाळण्यासाठी परीक्षेपूर्वी योग्य अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था (प्राधान्याने तळमजल्यावर) लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थीसाठी करण्यात यावी. उमेदवारास प्रश्नपत्रिका दिल्याच्या वेळेची नोंद अचूकपणे घेतल्याबाबतची तसेच त्यांना वेळेवर पुरवणी पत्रिका पुरविण्यात आल्याबाबतची खात्री करावी.

१६. परीक्षा मंडळ शक्यतेनुसार वाचनसाहित्य ब्रेल लिपीमध्ये पुरवेल किंवा ई-टेस्ट किंवा संगणक ज्याच्यामध्ये सुयोग्य असे स्क्रीन रिडींगचे सॉफ्टवेअर संलग्न करुन त्याचा वापर खुली पुस्तक परीक्षा (Open Book Exam) घेण्याच्यादृष्टीने करेल. त्याचप्रमाणे ऑनलाईन परीक्षा ही लक्षणीय (Benchmark) दिव्यांगत्व असलेल्या परिक्षार्थीसाठी वापरास सुगम्य असावी. उदा. वेबसाईट, प्रश्नपत्रिका व इतर अभ्यास साहित्य हे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित व सुगम्य असावेत. १७. ज्याप्रमाणे सद्यस्थितीतील धोरणानुसार अंध परिक्षार्थीना आकृती व आलेखाऐवजी इतर

वैकल्पिक प्रश्न उपलब्ध करुन देण्यात येतात त्याचप्रमाणे लक्षणीय (Benchmark ) दिव्यांगत्व असलेल्या कर्णबधीर परिक्षार्थीसाठी वर्णनात्मक प्रश्नांऐवजी इतर वैकल्पिक प्रश्न उपलब्ध देण्यात यावेत.

१८. शक्यतोवर सर्व दिव्यांग परिक्षार्थीच्या परीक्षा या तळमजल्यावर घेण्यात याव्यात. तसेच परीक्षा केंद्रे ही दिव्यांग व्यक्तींनी वापरण्याच्या दृष्टीने सुलभ व सुगम्य असावीत.

२. सदर शासन परिपत्रक संबंधीत मंत्रालयीन विभागांनी आपल्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख तसेच महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, मंडळे, सार्वजनिक उपक्रम व सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था यांच्या तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच आयुक्त, समाज कल्याण, आयुक्त, दिव्यांग कल्याण, व संचालक (बहुजन कल्याण विकास विभाग) यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील शैक्षणिक व सर्व प्रकारच्या संस्था यांना तातडीने पाठवावे आणि वरील सूचनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना त्यांना द्याव्यात, असेही आदेश देण्यात येत आहे.

संपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या डाउनलोड बटन वर क्लिक करावे.

Download Gr 

Download form for handicapped people writer


दिव्यांग व्यक्तींना परीक्षेमध्ये रायटर मिळण्यासाठी भरावयाचा फॉर्म

दिव्यांग व्यक्ती साठी परीक्षेमध्ये रायटर मिळण्याबाबत चा फॉर्म





Previous Post Next Post
//disable Text Selection and Copying