आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड पात्र उमेदवारास या प्रमाणपत्रांची पडताळणी करणे आवश्यक राहील.
१) वयोमर्यादा- विभागाच्या जाहिरातीमध्ये किमान व कमाल वयोमर्यादा विहीत करण्यात आलेली आहे. तेव्हा जाहिरातीत नमूद केलेनुसार मागास/अमागास/दिव्यांग खेळाडू/मागास व अमागास माजी सैनिक/ अनाथ/प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त/अंशकालीन प्रमाणपत्र धारण करणा-या वयोमर्यादा विचारात घेणे बंधनकारक राहील.
२) अधिवास जाहिरातीमध्ये नमूद केलेनुसार उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा. (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे) शासनाने वेळोवेळी विहित केलेले सक्षम अधिका-याचे प्रमाणपत्र पडताळणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
३) शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये गट-क संवर्गातील ५५ व गट ड संवर्गातील ०५ पदांसंबंधी शैक्षणिक अर्हता प्रसिध्द करण्यात आलेले आहे. शैक्षणिक अर्हता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास पुर्ण केलेली असावी. बहुउददेशीय आरोग्य कर्मचारी (पु), आरोग्य निरीक्षक व आरोग्य पर्यवेक्षक पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेचीच आहेत किंवा कसे, याकरिता विशेष लक्ष देऊन तज्ञ समितीकडून पडताळणी करण्यात यावी. नियमित क्षेत्र कर्मचारी (फवारणी कर्मचारी) या पदाच्या कागदपत्र पडताळणी करताना अनुभव प्रमाणपत्र, अनुभव कालावधीतील मंजूर मनुष्यबळ, हंगामी नियुक्ती आदेश, हजेरीपत्रक, वेतन देयक, पगार पत्रक वगैरे सर्व बाबीची तपासणी करुनच नियुक्तीकरीता विचार करण्यात यावा. मा. संचालक, आरोग्य सेवा पुणे यांनी निर्गमित केलेले दिनांक १२/०१/२०२२ रोजीचे परिपत्रकामधील बाबींच्या अनुषंगाने तपासणी करावी. तपासणी नंतरच नियुक्ती आदेश निर्गमित करावेत. अधिपरिचारिका पदाच्या निवडी करिता जाहिरातीत नमूद असल्या प्रमाणे शेक्षणिक अर्हता "Possess General Nursing and Midwifery Diploma from recognized institute Or Possess a Basic Bachelor of Science (Nursing) degree" असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम भारतीय परिचर्या परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण केलेला असावा. त्या संबंधित खालील प्रमाणपत्रे आवश्यक असून त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. सदर नियम हा माजी सैनिक उमेदवारांना सुद्धा लागू राहणार आहे.
१. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका
२. नर्सिंग अभ्यासक्रम पदविका / पदवी प्रमाणपत्र
३. जी एन एम / बी एस्सी नर्सिंग कोर्स पूर्णतेचे प्रमाणपत्र
४. नर्सिंग स्कूल/कॉलेज सोडल्याचा दाखला
५. महाराष्ट्र परिचर्या परिषदेचे नोंदणी व अद्यावत नूतनीकरण प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास संबंधित कौन्सिल कडे नोंदणीसाठी अर्ज केल्याचा पुरावा (Acknowledgement / Receipt) तपासणी वेळी उपलब्ध असणे आवश्यक राहील
६. इतर सर्व आवश्यक प्रमाणपत्रासह वरील सर्व प्रमाणपत्रे अधिपरिचारिकांच्या (शासकीय | खाजगी उमेदवारांच्या) पात्रतेकरिता अत्यंत आवश्यक आहेत.
४) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र- विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गातील उमेदवारांची सक्षम प्राधिका-यांनी प्रमाणित केलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जाहिरात प्रसिध्द झालेल्या वित्तीय वर्षापुवीचे (एप्रिल ते मार्च) वित्तीय वर्षातील म्हणजेच दिनांक ०१.०४.२०२१ ते दिनांक ३१/०३/२०२२ या वित्तीय वर्षापासून ते जाहिरात प्रसिध्द केलेल्या वित्तीय वर्ष २०२३-२४ या कालावधी दरम्यानचे असावे.
५) खेळाडू/दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भुकंपग्रस्त/अनाथ/अंशकालीन/माजी सैनिक/ईडब्ल्यूएस / फवारणी कामाचा अनुभव व अन्य अनुभव प्रमाणपत्र असल्यास, त्याबाबतचे सक्षम प्राधिकायांनी दिलेले मुळ प्रमाणपत्रांची तपासणी करावे आणि सदरील प्रमाणपत्र वैध आहे किंवा कसे, याबाबत संबंधित सक्षम प्राधिकारीकडे पाठविण्यात यावे. सदर सक्षम प्राधिका-याकडून प्रमाणपत्राच्या वैधतेविषयी लेखी अहवाल प्राप्त झालेशिवाय, अशा आरक्षणातील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येऊ नये.
६) संगणक अर्हता- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रं. प्रशिक्षण-२०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९-३-२००३ नुसार गट-क संवर्गातील उमेदवारांना त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचे आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील.
७) ज्या उमेदवारांकडे आवश्यक कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदा. पदवी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र वगैरे उपलब्ध नसल्यास त्यांनी रु.१००/- च्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे ०७ दिवसात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल. तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक, आरक्षण, अनुभव कागदपत्रे बोगस / बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रदद करण्यात येईल. या आशयाचे प्रतिज्ञापत्र/हमीपत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करुन घ्यावयाचे आहे.
८) क्रीडा विषयक अर्हता व क्रीडा प्रमाणपत्र अर्ज स्विकारण्याच्या दिनांक रोजीची अथवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील. तसेच त्यासंदर्भातील संबंधित विभागीय क्रीडा उपसंचालकांची क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल नियुक्तीपुर्वी सादर करणे आवश्यक राहील सदर क्रीडा प्रमाणपत्रची पडताळणी अहवाल तपासूनच संबंधित उमेदवाराच्या संबंधित पदावरील नियुक्ती आदेश निर्गमित करावेत.
९) दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे वैदयकीय मंडळाकडून तपासून घेण्याच्या अधीन राहून कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी. त्यांच्या नेमणूकीपुर्वी उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैदयकीय मंडळाकडून तपासणी केल्यानंतर ते नेमणूकीस पात्र ठरतील. दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पदावर निवड झालेल्या उमेदवारांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे शासन निर्णय दि.०६.१०.२०१२ मधील आदेशानुसार SADM नवीन संगणक प्रमाणालीव्दारे वितरीत करण्यात आलेले नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारानी शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, क्रमांक अप्रकि-२०१८/प्र.क्र.४६/आरोग्य-६, दिनांक १४ सप्टेंबर, २०१८ मधील आदेशानुसार केंद्र शासनाचे www.swavlambancard.gov.in या संगणकीय प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे.
१०) सामान्य प्रशासन विभाग, क्रं. बीसीसी-२०२१/प्र.क्र.१०६४/२०११/१६ब, दिनांक १२-१२-२०११ नुसार निवड झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांना नियुक्तीच्या दिनांका पासून ६ महिन्याच्या आत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अधीन राहून नियुक्ती आदेश देण्यात यावे. संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी अशा उमेदवारांकडून नियुक्ती आदेशापासून २ आठवडयात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे प्राप्त करुन घ्यावीत आणि नियुक्ती प्राधिका-याने विनाविलंब सदर कागदपत्रे संबंधित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवावी. याशिवाय संबंधित उमेदवाराने देखील स्वतंत्रपणे जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांच्याकडे असलेले कागदपत्रे / पुरावे सादर करुन पाठपुरावा करावा. याप्रमाणे शासन निर्णय दि.१२.१२.२०११ मध्ये विहीत मुदतीत जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकल्यास सदर उमेदवाराची पुर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येई, ही अट संबंधितांच्या नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात यावे. त्यासाठी नियुक्ती प्राधिका-यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांचा वेळोवेळी आढावा घ्यावा व विहीत मुदतीत जातवैधता सादर करू न शकणा-या उमेदवारांच्या बाबतीत तातडीने सेवा समाप्तीची कार्यवाही करावी. तसेच निवड करण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे जाती दावे (जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र) संबंधित समितीकडून निर्गमित करण्यात आल्याची खातरजमा करून घेण्याची कार्यवाही देखील नियुक्ती प्राधिका-यांनी करावी.
११) हिंदी व मराठी भाषा परीक्षेसंबंधी केलेल्या नियमानुसार जो उमेदवार अगोदर परीक्षा उत्तीर्ण झाला नसेल किंवा त्याला सदरहू परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळाली नसेल तर, सदरहू उमदेवारांना ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
१२) निवड झालेल्या उमेदवारांच्या पूर्व चारित्र्यांची पडताळणी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. चापअ १००८/प्र.क्र. २१४/०८/१६-अ, दिनांक ९.१.२००९ मधील तरतुदी विचारात घेऊन पोलीस विभागाकडून करून घ्यावी व अहवाल प्रतिकुल असल्यास, शासन परिपत्रक क्र. चापअ - १०१२ /प्र.क्र. ६३/१६ - अ, दिनांक २६.८.२०१४ रोजीच्या शासननिर्णयातील सूचनांनुसार संबंधित उमेदवारांच्या बाबत तातडीने कार्यवाही करून तसे या विभागास अवगत करावे." प्रस्तुत उमेदवारांची नियुक्ती त्यांच्या पूर्व - चारित्र्याची पडताळणी करण्यापूर्वी करण्यात येणार असल्यामुळे त्यांची नियुक्ती पुढील आदेश होईपर्यंत करण्यात आली आहे व पूर्व चारित्र्य अहवाल प्रतिकूल असल्यास शासन नियमानुसार पूर्वसूचना न देता सेवा समाप्ती करण्यात येईल." असा स्पष्ट उल्लेख उमेदवारांच्या नियुक्तीच्या आदेशात करण्यात यावा.
१३) अनाथांसाठी आरक्षित पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमदेवारांबाबत शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग क्र अनाथ / प्र.क्र. १८२ / का ३ दिनांक २३.८.२०२१ नुसार सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेल्या विहीत नमुन्यातील प्रमाणपत्र आवश्यक राहील.
१४) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले विहीत नमुन्यातील व विहीत कालावधीतील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकात मोडत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
१५) कागदपत्र पडताळणी फेरीचे निरीक्षण संपूर्ण फेरीचे निरीक्षण संचालनालयाचे प्रतिनिधी करतील. त्यांना फेरीच्या नियोजनाबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन द्यावी. तसेच संपूर्ण प्रक्रियेचे इतिवृत्त तयार करावे व त्यावर सर्व समिती सदस्यांनी स्वाक्षरी करुन त्याची प्रत शासनास, मा.आयुक्त यांना व संचालनालयास सादर करावी.
उपरोक्त नमूद केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुनच निवड यादीनुसार नेमणूकीस पात्र उमेदवारांना समुपदेशनाव्दारे नियुक्ती आदेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी व समुपदेशन समितीचा कार्यवृंतात या कार्यालयास वेळोवेळी सादर करावा.